बंगळूर : ”आमच्या दोघांमध्ये आता कोणतेही मतभेद नाहीत. नेतृत्व बदलावरून काही किरकोळ संभ्रम निर्माण झाला होता. तो आम्ही दूर केला आहे. आम्ही आगामी विधानसभा निवडणुका एकदिलाने जोमाने लढण्याचा निर्णय घेतला आहे”, असे सांगत मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी तूर्त दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे संकेत दिले. त्यामुळे तातडीने मुख्यमंत्री बदलला जाणार हे निश्चित जाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी दोघांची न्याहरीबैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवकुमारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले असून, येत्या मंगळवारी ही स्नेहभोजन बैठक होईल. तीत नेतृत्त्वबदल कधी करायचा, यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मुख्यमंत्रिपद शिवकुमारांकडे दिले जाण्याची शक्यता आहे.
दोन आठवड्यांपासून राज्यात नेतृत्वबदलाचा संघर्ष सुरू आहे. काँग्रेस हायकंमाडने त्याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनीच एकमेंकाना भेटून तोडगा काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शनिवारी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शिवकुमार यांना आपल्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी आमंत्रित करून तब्बल 45 मिनिटे चर्चा केली. केवळ दोघांचीच बैठक झाली. त्यामुळे नेमकी चर्चा गुप्त आहे. मात्र मार्चमध्ये नेतृत्त्वबदलावर एकमत झाल्याचे समजते.
गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटात नेतृत्व बदलावरून जोरदार हालचालींचे पेव फुटले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांचे दिल्ली दौरे व जेवणाच्या बैठकामधून सक्रियता वाढली होती. तर या दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून लक्ष वेधले होते. त्यामुळे राज्यातील जनतेसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या संदर्भात अखेर हायकमांडने हस्तक्षेप करत तुम्ही दोघांनी वाटाघाटी करून नेतृत्व बदलावर तोडगा काढावा, अशा सुचना केल्या होत्या. तसेच तुमच्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद, गोंधळ व गैरसमज नाही, असा संदेश राज्यातील जनतेला द्यावा, असे सुचविले होते. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नसून आपण एक आहोत, असे म्हणत या प्रकरणावर तृतास पडदा टाकण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, ज्याप्रमाणे आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीत एकत्र काम करून पक्षाला सत्तेत आणले. तसेच भविष्यातही काम करणार आहे. आमच्यात गोंधळ निर्माण करण्याचे विरोधी पक्षांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केली होती. हायकंमाडच्या निर्णय व सूचनांनुसार आम्ही दोघहेी वाटचाल करू.
राज्यातील मंत्री असो अथवा आमदार; कोणाच्याही मनात गैरसमज नसून आजपासून या विषयावर कोणताही गोंधळ होणार नाही. बेळगावात आगामी हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून होत असून, त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शिवाय आमच्यात झालेल्या कराराची माहिती हायकमांडला दिली जाणार आहे, असेही दोन्ही नेत्यांनी सांगितले.
काही माध्यमांनी संघर्ष वाढवून गोंधळ घातला. राज्यातील काही मंत्री व आमदार मंत्रिमंडळ फेरबदलाच्या संदर्भात दिल्लीला गेले असतील. त्याचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही. 2028 च्या विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका, जिल्हा व ग्रामपंचायत निवडणुका आणि पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काय करता येईल यावर आमची चर्चा झाली. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांना प्रभावीपणे तोंड दिले जाईल. खोटा प्रचार, आरोप करणे हेच भाजप व निजदचे काम असल्याची टीकाही दोन्ही नेत्यांनी केली.
हायकंमाडने दिल्लीला बोलावले तर आम्ही जाऊ. शिवाय आगामी लोकसभा अधिवेशनात मका, ऊस दर निश्चित, सिंचन प्रकल्पांबाबत खासदारांनी आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्हाला खासदारांसोबत या विषयावर चर्चा करायची आहे. केंद्र सरकार मक्याच्या मुद्द्यावर राज्याला आवश्यक सहकार्य देत नाही. या मुद्द्यांमध्ये केंद्राकडून मदत मिळवणे हा राज्याचा अधिकार आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून विनंती केली आहे. आम्ही खासदारांसोबत या मुद्द्यावर चर्चा करू व त्यांना या मुद्द्यावर केंद्रावर दबाव आणण्यास सांगू. सर्वांनी मिळून राज्याचे हित जपले पाहिजे. केंद्रीय मंत्र्याच्या सूचनेनुसार आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहोत, असेही शिवकुमार म्हणाले.