Karnataka politics News | कर्नाटकात नेतृत्व बदलाचे संकेत; राहुल गांधींची तयारी

उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची मोर्चेबांधणी; 1 डिसेंबरआधी निर्णय
Karnataka politics News
Karnataka politics News | कर्नाटकात नेतृत्व बदलाचे संकेत; राहुल गांधींची तयारी
Published on
Updated on

बंगळूर/नवी दिल्ली : कर्नाटक सरकारचे नेतृत्व लवकरच बदलले जाण्याचे संकेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे कर्नाटकची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

1 डिसेंबरच्या आधी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पक्षावर दबाव वाढवण्यासाठी शिवकुमार यांनी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची 29 नोव्हेंबरला भेट मागितली आहे. शिवाय, त्यांनी मोर्चेबांधणी सुरूच ठेवताना स्वपक्षातील विरोधक सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळींची मनधरणी चालवली आहे. आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळाल्यास जारकीहोळींना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद अशी दुहेरी ऑफर शिवकुमारांनी दिल्याचे समजते. परिणामी, जारकीहोळींनी मवाळ भूमिका घेत बुधवारी आयोजिलेली दलित मंत्र्यांची स्नेहभोजन बैठक रद्द केली आहे.

दरम्यान, येत्या 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाआधी नेतृत्व बदलाचा निर्णय होईल, असे मानले जाते. लोकसभेचे हिवाळी अधिवेशनही 1 डिसेंबरपासून होत असून, त्याआधी निर्णय घ्यावा, असा दबाव शिवकुमारांनी आणला आहे. बंगळूरला तीन दिवस ठाण मांडून बसलेले पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांशी बातचित करून मंगळवारी दिल्लीला परतले. ते आता राहुल गांधींची भेट घेऊन राजकीय परिस्थितीची माहिती त्यांना देतील. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. शिवकुमार यांनीही राहुल यांच्याशी मोबाईलवरून थेट संपर्क साधला. मात्र ‘प्लीज वेट, आय विल कॉल’ (कृपया थांबा, मी संपर्क करतो), असा संदेश राहुल यांनी त्यांना व्हॉटस्अ‍ॅपवरून दिला आहे.

मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल यांनी कर्नाटकचे माहिती-तंत्रज्ञानमंत्री प्रियांक खर्गे आणि शरद बच्चेगौडा यांना दिल्लीला पाचारण केले होते. त्यांच्या भेटीत राहुल यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी गेल्या आठवड्यात ‘सत्तावाटपाचा कोणताच फॉर्म्युला ठरलेला नसून, मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार,’ असे म्हटले होते. त्यावर राहुल यांनी संताप व्यक्त करत जाहीर वक्तव्य करण्यापासून सिद्धरामय्या स्वतःला रोखू शकत नाहीत का, असा प्रश्न केला. त्यानंतर दिल्लीहून परतल्यानंतर प्रियांक खर्गे यांनी तातडीने आधी मुख्यमंत्र्यांची आणि नंतर उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची भेट घेतली. प्रियांक यांच्याकरवी राहुल यांनी दोन्ही नेत्यांना स्पष्ट संदेश पाठवल्याचे मानले जाते. या भेटी सिद्धरामय्यांसाठी धोक्याची घंटा मानली जाते.

हायकमांड माझे हित पाहतील

काँग्रेस हायकमांड माझे हित पाहतील, असा विश्वास शिवकुमार यांनी व्यक्त केला. बुधवारी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील घडामोडींविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता हायकमांड आम्हाला दिल्लीला बोलावून आमच्याशी चर्चा करण्याची शक्यता असून, त्यासाठी मी उत्सुक आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीबाबतही त्याचवेळी चर्चा करू.

जारकीहोळी हे मित्र

सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी माझे मित्रच आहेत. आम्ही यापूर्वी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून एकत्र काम केले आहे. मंगळवारी रात्री मी त्यांना भेटलो. सरकार आणि पक्ष संघटनेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत यावे व 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत. या उद्देशाने आम्ही काम करण्याचा निश्चय केला आहे. आमच्यात कोणताही गट नाही. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सदस्य आहोत. पक्षाचे सर्व आमदार एकत्र आहेत. भाजप व जेडीएस समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही कारणास्तव यशस्वी होता येणार नाही, असेही शिवकुमार यांनी म्हटले आहे.

शिवकुमार यांना भाजपचा पाठिंबा?

शिवकुमार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्यास भाजपने पाठिंबा द्यावा, अशा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते सदानंद गौडा यांच्या सूचनेवर उत्तर देताना शिवकुमार म्हणाले, अशी परिस्थिती येणार नाही. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकसंध व हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करणारे आहेत. त्यामुळे सध्या मी नेतृत्व बदलावर जास्त काही बोलणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news