बेळगाव : केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 1) काळा दिन पाळण्यात येणार आहे. मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा, सकाळी 9.30 वाजता संभाजी उद्यान येथून निघणार्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करावेत. फेरी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे तसेच पदाधिकार्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर समिती, तालुका समितीने केले आहे.
काळ्यादिनाबाबत गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि तालुक्यात बैठका घेण्यता आल्या आहेत. त्याला प्रतिसाद मिळाला असून बेळगाव शहर आणि तालुक्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यानी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. खानापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तर निपाणी येथे निषेध फेरी काढून जाहीर सभा होणार आहे.
काळ्यादिनाच्या निषेध फेरीला सकाळी 9.30 वाजता संभाजी उद्यान येथून प्रारंभ होणार असून चोन्नद स्टील, महाद्वार रोड, गजाननराव भातकांडे शाळा, एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, अंबाभुवन रोड, शिवाजी रोड, शेरी गल्ली कॉर्नर, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, होसुर बसवान गल्ली, सरकारी मराठी शाळा क्रमांक 8 नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडे बाजार, बँक ऑफ इंडिया कॉर्नर, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, मराठा मंदिर येथे निषेध फेरीची सांगता होणार आहे.