Bengaluru accident:
बेंगळूर: चिखल आणि खराब झालेल्या मुख्य रस्त्यावरून जाताना अचानक ब्रेक लावला आणि दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. त्याचवेळी समोरून आलेल्या ट्रकने तिला चिरडले. बेंगळूरच्या इलेक्ट्रॉनिक्स सिटीजवळील अनंतनगर मुख्य रस्त्यावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. मेधा आकर्ष (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे.
मेधा ही ईपीएफ कार्यालयात काम करत होती. सकाळी ९ च्या सुमारास ती अजय गुरू या सहकाऱ्यासोबत अनंतनगर मुख्य रस्त्यावरून दुचाकीवरून सिंगासंद्राच्या दिशेने जात होती. खराब आणि चिखलमय रस्त्यावरून जात असताना, एका पादचाऱ्याला वाचवण्यासाठी समोरच्या कारने आणि दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावले.
ब्रेक लावल्यामुळे मेधा दुचाकीवरून रस्त्यावर फेकली गेली; त्यानंतर मिनी-ट्रक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
अपघातात बळी पडलेली मेधा आकर्ष ही मूळची केरळची होती. ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) कार्यालयात काम करत होती. तिच्या पश्चात पती आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेसाठी त्यांनी महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अपघातास रस्त्याची खराब स्थितीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. रस्त्याची स्थिती खराब असल्याचे मान्य करूनही, पोलिसांनी स्पष्ट केले की प्राथमिक तपासात अचानक ब्रेक लावणे हेच अपघाताचे कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणालाही त्या मिनी-कार्गो वाहनाचा नोंदणी क्रमांक लक्षात आला नाही. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहोत.