बेळगाव

Fake Video Viral : 'विधानसौध' बॉम्बस्फोट AI-जनरेटेड व्हिडिओप्रकरणी बंगळुरूमध्‍ये बिहारी तरुणाच्‍या आवळल्‍या मुसक्‍या

सायबर पोलिसांनी 'इंटरनेट प्रोटोकॉल' (IP) लॉग्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे घेतला आरोपीचा शोध

पुढारी वृत्तसेवा

Vidhana Soudha AI Blast Video Arrest : बंगळुरू येथील कर्नाटक राज्याच्या सर्वोच्च सुरक्षा क्षेत्रातील 'विधानसौध' (मंत्रालय) बॉम्बने उडवून दिल्याचा बनावट (AI-generated) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्‍हायरल झाला होता. या प्रकरणावरून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत होता. 'विधानसौध' इमारतीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा AI-जनरेटेड व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी बंगळुरू शहर पोलिसांनी बिहारमधील एका २५ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. हजरत अली शोएब (वय २५, रा. अरारिया, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

इन्स्टाग्रामवर फिरत होता बोगस व्हिडिओ

मंगळवारी सकाळी 'jnx_king_h_g' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओच्या सुरुवातीला विधानसौध इमारतीचे बाह्य दृश्य दिसते आणि त्यानंतर 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून इमारतीमध्ये भीषण स्फोट झाल्याचे बनावट दृश्य तयार करण्यात आले होते. या व्हिडिओसोबत "विधानसभा उडा दिया बम से" अशी प्रक्षोभक कॅप्शनही देण्यात आली होती.

सोशल मीडियावर संताप

ऐन दसर्‍याच्या दिवशी अशा प्रकारे सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या या व्हिडिओमागचा हेतू नेमका काय, असा सवाल करत नेटकरी तीव्र रोष व्यक्त करत होते. या व्हायरल पोस्टवर अनेक संतापलेल्या नागरिकांनी आणि युजर्सनी बंगळुरू पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलला टॅग केले होते.

डिजिटल पाळतीतून उघडकीस आला प्रकार

या प्रकाराचे गांभीर्य ओळखून विधानसौध पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्‍हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सायबर पोलिसांनी 'इंटरनेट प्रोटोकॉल' (IP) लॉग्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास चक्र फिरवत आरोपी शोएबचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.

मूळचा बिहारचा असणारा शोएब पाईपफिटर

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा गेल्या काही महिन्यांपासून बंगळुरूमध्ये पाईपफिटर म्हणून मजुरीचे काम करत होता. बोगस व्‍हिडिओ प्रकरणी त्‍याला अटक करण्‍यात आली आहे. न्‍यायालयाने त्‍याला पोलीस कोठडी सुनावली आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा त्याचा मुख्य हेतू काय होता, तसेच या कृत्यात त्याला अन्य कोणी मदत केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT