निपाणी : दारूच्या नशेत वेदगंगा नदीत उडी घेतलेल्या तरूणाचा मृतदेह २६ दिवसांनी सापडला. कुन्नूर-भोज या वेदगंगा पात्रात पुलाजवळ बुधवारी (दि.१६) त्याचा मृतदेह आढळून आला. अमित तानाजी रोकडे (वय २५ रा. देवकेवाडी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे या तरूणाचे नाव असून तो कागलमधील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता.
याबाबतची अधिक माहिती अशी, अमित रोकडे हा कागल येथील हॉटेल अशोकामध्ये कामाला होता. २१ जुन रोजी तो दुचाकीवरून सुट्टीवर आपल्या मूळगावी जात होता. दरम्यान कुर (ता.भुदरगड) येथील वेदगंगा नदीच्या पुलावर आल्यानंतर त्याने आपली दुचाकी पुलावर पार्क करून दारुच्या नशेत वेदगंगा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. दरम्यान ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती दुचाकी नंबरच्या आधारे कुटुंबासह पोलिसांना दिली. त्यानंतर भुदरगड व कागल पोलिसांनी वेदगंगा नदीत शोधमोहिम राबविली होता, मात्र त्याचा मृतदेह मिळून आला नाही. दरम्यान बुधवारी कुन्नूर-भोज वेदगंगा पुलाजवळ पाण्याच्या प्रवाहाबरोबर एक मृतदेह वाहत आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हा मृतदेह अमितचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
२१ जूनला अमित रोकडे याने नदीत उडी घेतल्यानंतर भुदरगड, कागल व निपाणी पोलीस यंत्रणा गेल्या २६ दिवसांपासून नदीकाठावर लक्ष ठेवून होती. यामध्ये बीट पोलीस कर्मचाऱ्यांना उडी घेतलेल्या अमित रोकडे याची सविस्तर माहिती दिली होती. अखेर २६ दिवसानंतर अमितचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून त्यांच्या वडिलांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.