बेळगाव : संततधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त शुभा बी. आणि अधिकार्यांनी बुधवारी सलग दुसर्या दिवशी सखल भागांची पाहणी करून पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजण्याच्या सूचना केल्या. आमदार राजू सेट यांनीही बेळगावच्या उत्तर भागातील सखल भागांची पाहणी केली.
शहरात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून, काही भागांत घरे आणि दुकानांत पाणी शिरले आहे. त्यामुळे महापालिकेकडे लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यानुसार बुधवारी आयुक्त शुभा बी. यांनी मारुती नगर, अमन नगर, पंजीबाबा या सखल भागांची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंडळाच्या जेसीबीद्वारे पाण्याचा निचरा करण्यात आला.
मोठा पाऊस झाला की या भागात कायम पाणी तुंबून राहते. त्यामुळे घरांत पाणी शिरत आहे. महापालिकेने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशा सूचना यावेळी आमदार सेट यांनी केल्या.
महापालिकेच्या बागायत विभागाने शाहू नगर, टिळकवाडी, शिवाजी नगरमध्ये? ? कोसळलेली झाडे हटविली. पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्यासाठी महापालिकेने तीन पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांना रात्रंदिवस सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अद्याप कोणतेही कुटुंब विस्थापित झालेले नाही. त्यामुळे निवारा केंद्र सुरू करण्याबाबत महापालिकेने विचार सुरू केला आहे.
नाला सफाई करण्यात आली आहे, असा दावा महापालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाकडून वारंवार करण्यात आला होता. पण, दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नाल्यांचे पाणी बाहेर आले असून नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे.