खानापूर : तालुक्यासह पश्चिम घाटातही पावसाचा जोर कमी झाल्याने शनिवारी आणि रविवारी विकेंडची पर्वणी साधून पर्यटकांनी पारवाड, चिखले, चिगुळे या घाटमाथ्यावरील धबधब्यांच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेतील तरुणांच्या टोळक्यांकडून हुल्लडबाजीचे प्रकार घडल्याने पोलिस व वनखात्याने बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली जात आहे.
हिरवागार निसर्ग, उंचावरुन दरीत फेसाळत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि धुक्याची चादर ओढलेले डोंगर पाहण्यासाठी पश्चिम घाटातील पर्यटनस्थळांवर सध्या पर्यटकांची एकच गर्दी होत आहे. हुबळी, धारवाड, बेळगाव परिसरातून कार व दुचाकीवरून मित्रांचे गट पश्चिम घाटाला भेट देत आहेत. रविवारी (दि. 29) सुट्टीची पर्वणी साधून शेकडो वाहनांची रिघ लागल्याचे दिसून आले.
वनखात्याने चिखलेतील सवतुरा धबधब्याच्या ठिकाणी रेलिंग उभारुन पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चिखले ते पारवाड या धबधब्याला जाणार्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून चिखलात वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत.
चिखले धबधब्यापासून जवळच पारवाड गावच्या हद्दीत देवूची न्हय धबधबा आहे. हा धबधबाही पर्यटकांची गर्दी खेचतो. या चिखले ते पारवाड सहा किलोमीटर अंतर रस्त्याचा विकास झाल्यास चिखले, पारवाड, कणकुंबी अशी एकाच मार्गाने निसर्गाची सफर करणे सहज शक्य होणार आहे.