बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा (व्हीटीयू) 25 वा वार्षिक पदवीप्रदान समारंभ शुक्रवार दि. 4 सकाळी 11 वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात 60 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती व्हीटीयूचे कुलगुरु प्रा. विद्याशंकर यांनी मंगळवारी (दि.1) पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. विद्याशंकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारी व खासगी क्षेत्रातील भरतीदरम्यान पदवी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने 2023 पासून वर्षातून दोनवेळा पदवीप्रदान समारंभ घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती थावरचंद गेहलोत अध्यक्षस्थानी असतील. उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्य वक्ते पद्मश्री पुरस्कार विजेते व भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजयकुमार सुद मार्गदर्शन करणार आहेत.
इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन, उद्योजक व पद्मश्री पुरस्कार विजेते प्रशांत प्रकाश, बंगळूर विद्यापीठाचे कुलगुरू सी. एस. सुंदर राजू यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरव करण्यात येणार आहे. 60,052 पदवीधरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बसस्थानक ते विद्यापीठ या मार्गावर सकाळी 7.30 ते 9.या वेळेत मोफत बस सेवा उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी कुलसचिव प्रा. बी. ई. रंगास्वामी, मूल्यांकन कुलसचिव प्रा. टी. एन. श्रीनिवास उपस्थित होते.
नम्रता सी. प्रभू- 13 सुवर्णपदके सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग (ऑक्स्फर्ड महाविद्यालय, बंगळूर), नव्याश्री गणपिशेट्टी 11 सुवर्णपदके- इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग (आर. व्ही. इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, महाविद्यालय बंगळूर), कार्तिक एल- 7 सुवर्णपदके, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग, कवना ए.- 7 सुवर्णपदके इलेक्ट्रिक अॅण्ड कम्युनिकेशन, म्हैसूर, मोहिनी व्ही. - 6 सुवर्णपदके संगणक विज्ञान व अभियांत्रिकी, (दयानंद सागर अकादमी ऑफ टेक्नॉलॉजी, बंगळूर), जान्हवी के. - 5 सुवर्णपदके, इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, बंगळूर, मेदिनी एस. राव - 4 सुवर्णपदके, इन्फर्मेशन सायन्स व इंजिनिअरिंग, (मंगळूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुडबिद्री), रक्षिता एम.- 2 सुवर्णपदके एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, (ईस्ट वेस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बंगळूर).