Panaji University Issue
पणजी : पहिल्या व दुसर्या वर्षात बॅकलॉग (काही विषयांत नापास) असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या तिसर्या वर्षासाठी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. विविध महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू तसेच कुलसचिवांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे. तसेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
या प्रश्नावर विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुलगुरू व कुलसचिवांची भेट घेण्यासह गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळानेही कुलगुरूंची स्वतंत्रपणे भेट घेऊन निवेदन सादर केले. बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्या वर्षाला प्रवेश द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन सादर केल्याची माहिती गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष विनय राऊत यांनी दिली.
महाविद्यालयीन पातळीवर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. एनईपीमुळे पहिल्या व दुसर्या वर्षात काही विषयात नापास (बॅकलॉग) झालेल्या विद्यार्थ्यांना तिसर्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. बॅकलॉग असलेले 1 हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. प्रवेश मिळाला नाही तर त्यांचे वर्ष वाया जाणार आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी प्रवेश देण्याची मागणी असल्याचे अमेय किंजवडेकर म्हणाले.
सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक बोलावून यावर चर्चा केली जाईल. प्राचार्यांच्या सल्ल्याने प्रवेशाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांनी बैठकीनंतर सांगितले.
पहिल्या दोन वर्षात बॅकलॉग असल्यास तिसर्या वर्षासाठी प्रवेश न देण्याचा नियम 2010 वर्षापासून आहे. फक्त कोविड काळात सूट म्हणून बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्या वर्षासाठी प्रवेश देण्यात आला होता. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून याची कल्पना वेळोवेळी देण्यात आली नाही. यामुळे यंदाच्या वर्षासाठी बॅकलॉग विद्यार्थ्यांना प्रवेशाची सूट कायम ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी मंडळाने केली आहे.