उचगाव : गावच्या वेशीत उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवरील मराठी अक्षरांची तालुका प्रशासनाला अॅलर्जी झाली आहे. याठिकाणी असणारी मराठी अक्षरे कमी करुन कन्नड अक्षरे मोठी करावीत, अशी सूचना ता. पं. कार्यकारी अधिकारी यशवंतकुमार यांनी दिली आहे. यामुळे ग्रामस्थांसह सीमाभागातील मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उचगाव ग्राम पंचायत कार्यालयात यासाठी बुधवारी (दि. 31) ता. पं. कार्यकारी अधिकारी यशवंतकुमार यांनी बैठक घेतली. ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे अध्यक्षस्थानी होत्या. ग्रा. पं. सदस्यांनी फलकावरील मराठी अक्षरे हटविण्यास विरोध दर्शविला. याभागात सर्व जातीधर्माचे, भाषेचे नागरिक राहतात. ते गुण्यागोंविदाने नांदतात. त्यांचा मराठी अक्षरांना आक्षेप नाही. परंतु, प्रशासनाने याबाबत आग्रह धरु नये. हटविण्याचा प्रकार झाल्यास लोकांतून विरोध होईल. त्याला जबाबदार प्रशासन राहील असा इशारा देण्यात आला.
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर गावच्या वेशीत ग्राम पंचायतीने पाच वर्षांपूर्वी स्वागत कमान उभी केली आहे. त्यावर मराठीसह कन्नड भाषेतील मजकूर आहे. मात्र, फलकावर मराठी अक्षरे मोठी आहेत. याचा पोटशूळ काही कन्नड संघटनेच्या नेत्यांना उठला आहे. यापूर्वी 2022 मध्येही फलकावरील मराठी अक्षरे बदलण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, मराठी भाषिकांनी विरोध केल्याने प्रशासनाने नमती भूमिका घेतली होती. आता, पुन्हा प्रशासन सक्रिय झाले असून कन्नड भाषेतील मजकूर 60 टक्के तर मराठी भाषेतील मजकूर 40 टक्के लावण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले यांनी बैठकीत अधिकार्यांना जाब विचारला, उचगाव भागात सर्व भाषेचे नागरिक आहेत. त्यांच्याकडून कधीही विरोध झालेला नाही. प्रशासनाकडून मात्र दबाव आणण्यात येत आहे. 60:40 चा मुद्दा पहिल्यांदा सरकारने आपल्या कार्यालयावर अंमलात आणावा. त्यानंतर स्वागत कमानीवरील मराठी अक्षरे कमी करावीत, असे सुचविले.
कानडी संघटनांचा हेका
यापूर्वी 2022 मध्ये फलकावरील मराठी अक्षरे हटविण्यासाठी कन्नड संघटनांनी प्रयत्न केले. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पत्तार नामक व्यक्तीने फलकावरील मजकुरावरुन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार केली असून याबाबत आदेश आला असल्याची माहिती ईओ यशवंतकुमार यांनी दिली आहे. यामुळे मराठी-कन्नड भाषिकांत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.