बेळगाव : सायबर क्राईममध्ये फसवणूक करणारे जसे बाहेरच्या राज्यातील आहेत तसेच बेळगावचेही भामटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगावच्या तिघा भामट्यांनी तामिळनाडूतील 27 जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार तामिळनाडू पोलिसांनी या त्रिकुटाला गुरुवारी (दि. 24) अटक करून चेन्नईला नेले. अनिल कोल्हापूर (रा. कुवेंपूनगर), रोहन कांबळे (रा. गणेशपूर) व सर्वेश किवी (रा. आरटीओ सर्कल परिसर) अशी संशयितांची नावे आहेत.
उपरोक्त संशयितांनी बनावट कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे बँक खाती तयार करून त्याद्वारे फसवणूक केली जात होती. अशा प्रकारे त्यांनी 27 जणांची फसवणूक केली असून फसलेले बहुतांश तामिळनाडूतील आहेत. याबाबत चेन्नईत एफआयआर दाखल झाल्यानंतर तेथील पोलिसांनी याचा तपास सुरू केला होता.
फसवणूक करणारे भामटे बेळगावचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चेन्नईतील एक पथक चार दिवसांपूर्वी बेळगावात दाखल झाले. तेथील पोलिस महासंचालकांचे पत्र आणून त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. विशेषतः सीईएनचे उपअधीक्षक जे. रघू, पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या मदतीने या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची आधी पूर्णपणे चौकशी केली. यानंतर गुरुवारी सायंकाळी या तिघांना जिल्हा न्यायालयासमोर हजर करून त्यांना चेन्नईला घेऊन पथक रवाना झाले. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.