बेळगाव : तीस वर्षांपूर्वी वाटणीसंदर्भातील नोंद करण्यासाठी 500 रुपये लाच घेताना लोकायुक्तांना सापडलेल्या कडोलीतील (ता. बेळगाव) तलाठ्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे, त्या तलाठ्याला अटक करुन कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नागेश धोंडू शिवनगेकर असे त्याचे नाव आहे.
नागेश कडोलीत तलाठी म्हणून काम पाहत होता. तक्रारदार लक्ष्मण रुकम्माण्णा कटांबळे यांची व भावाची वाटणी झाली. त्याची नोंद करण्यासाठी ते तलाठ्याकडे गेले. त्यावेळी त्याने 500 रुपयांची मागणी केली.
या प्रकरणी कटांबळे यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी 6 डिसेंबर 1995 रोजी सापळा रचून 500 रुपये घेताना नागेशला रंगेहाथ पकडले. लोकायुक्त विशेष न्यायालयाने 14 जून 2006 रोजी तलाठ्याला वर्षाचा कारावास आणि हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या निकालाविरोधात तलाठ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धारवाड खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा रद्द केली. त्या विरोधात संबंधित व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम केली आहे. त्यामुळे तब्बल तीस वर्षानंतर त्या तलाठ्याला अटक करून त्याची रवानगी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.