खानापूर : घरफोडीच्या घटनांनी खानापूर तालुका हादरला आहे. रविवारी (दि. 12) एकाच रात्रीत सहा गावातील दहा घरे फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. सावरगाळीतील नारायण भेकणे यांच्या घरातून 15 लाख रोख, 16 तोळे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीसह सुमारे 32 लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. सर्व ठिकाणी कुलूपबंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, नारायण व त्यांची आई बहिणीच्या घरी गेले होते. तर सैन्यात असलेला धाकटा भाऊ ओंकार संगरगाळीत पत्नीच्या घरी गेला होता. गावच्या मध्यभागी घर असल्याने त्यांना चोरीचा धोका वाटला नाही. त्यांनी रोख रक्कम व दागिने तिजोरीत ठेवले होते. रात्री चोरांनी समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरीचे लॉक तोडून आतील रोख रक्कम व दागिन्यांवर डल्ला मारला. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास ओंकार घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
नंदगडचे पोलिस निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी, उपनिरीक्षक बदामी यांनी घटनास्थळी भेट दिली. भेकणे यांच्या पहिल्या मजल्यावरील कपाटातही पाच तोळ्याचे गंठण होते. मात्र, चोरट्यांनी वरच्या मजल्यावर जाण्याची तसदी न घेतल्याने ते बचावले. मात्र, दिवाळीत शेती खरेदीसाठी त्यांनी कर्ज काढून साठवलेली रक्कम चोरट्यांनी लांबविली.
शेजारी असलेल्या बाळू घाडी यांच्या घरातही अशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दागिने व रोख रक्कम कपाटाऐवजी अन्यत्र लपवून ठेवल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागू शकले नाही. घटनेनंतर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, ते खानापूर-रामनगर महामार्गापर्यंत जाऊन माघारी फिरले. त्यामुळे, महामार्गावर वाहन थांबवून चोरटे चालत गावात शिरल्याचे स्पष्ट होते.
शिंपेवाडीतील सचिन कंग्राळकर, प्रवीण कंग्राळकर आणि कृष्णा पाटील या तिघांच्या घरातही अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याठिकाणीही चोरांच्या हाती काहीच लागू शकले नाही. त्याशिवाय गुंजी आणि खानापूरमध्ये प्रत्येकी एका घरात चोरीचा प्रयत्न झाला. बरगावमधील सुभाणी बडेघर यांच्या घरातून 10 हजार रुपये रोख आणि चांदीचे दागिने लांबविण्यात आले. तर रामगुरवाडीतील एका घरातून दोन हजार रुपये लांबविण्यात आले आहेत. त्यामुळे, लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
घरफोडी केल्यानंतर संबंधित घराला सोबत आणलेले कुलूप लावून चोरटे गेले आहेत. यामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना चोरीची लवकर कल्पना आली नाही. गुंजी आणि खानापूर शहरात सापडलेल्या सीसीटीव्ही चित्रणामध्ये दोन दुचाकींवरुन आलेल्या चार चोरट्यांनी घरफोड्या केल्याचे दिसून येते. त्यांनी कपड्याने तोंड झाकलेले होते. कुलूपबंद असलेल्या घरांनाच त्यांनी लक्ष्य बनविले आहे. बहुतेक ठिकाणी समोरच्या दरवाजाला असलेले कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे.