संकेश्वर : मुलगीला भेटून दुचाकीवरून गावाकडे परतणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे 5 लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास करण्यात आल्या. सदर घटना मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे लोकांत भीतीचे वातावरण आहे.
महादेवी कुरबर (वय 60) व सिदलिंगप्पा कुरबर (73, रा. हेब्बाळ, ता. हुक्केरी) हे दाम्पत्य संकेश्वरातील हाऊसिंग कॉलनी येथे मुलगीला भेटून नेसरी गार्डनमार्गे कोर्टाकडून गावी हेब्बाळकडे दुचाकीने परत जात होते. कोर्टानजीक आल्यावर मागून हेल्मेट घालून आलेल्या दोघा चोरट्यांनी कुरबर यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून चाकूचा धाक दाखवला. घाबरून महादेवी यांनी आरडाओरडा केला. मात्र परिसरात कोणीच नसल्याने चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हिसकावून घेऊन मार्केट यार्डमधून दुचाकीवरून धूम ठोकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुरबर दाम्पत्य भांबावले. या घटनेबाबत उशिरा संकेश्वर पोलिसांत बिराप्पा कुरबर यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस ठाणे परिसरातील असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून सीपीआय शिवशरण आवजी पुढील तपास करत आहेत.