अंकली : जमखंडी-मिरज आंतरराज्य मार्गावरील रायबाग तालुक्यातील हालशिरगूर गावाजवळ सिमेंटवाहू कंटेनर शाळेला जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर उलटल्याने एक विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. अपघातात आणखी दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांना हारुगिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
अमित कांबळे (वय 11, रा. सुटट्टी क्रॉस) असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पाचवीत शिकत होता. अंजली कांबळे (10) व अविनाश कांबळे (8) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. सुटट्टी क्रॉस येथील कांबळे वसाहतीतील तीन विद्यार्थी सकाळी हालशिरगूर शाळेला जात होते. मिरजहून जमखंडीकडे सिमेंटची वाहतूक करणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याकडेने जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पलटी झाला. त्यात अमितचा जागीच मृत्यू झाला. अंजली व अविनाश जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रायबाग तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळासह रुग्णालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या कंटेनर चालकाविरोधात कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरु आहे.