

जयसिंगपूर/संबरगी : जयसिंगपूर - विजापूर - बेळगाव महामार्गावरील मुरगुंडी (ता. अथणी) येथे गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या विचित्र अपघातात तीनजणांचा मृत्यू झाला आहे. या विचित्र घटनेत दोन अपघातग्रस्तांना मदत करणारा व्यक्तीही मृत्युमुखी पडला.
शिरोळ तालुक्यातील महेश सुभाष गाताडे (38, रा. गणेशवाडी) व शुभम युवराज चव्हाण (24, रा. कुटवाड) हे उसाची रोपे घेऊन बोलेरो टेम्पोने अथणीहून गणेशवाडीकडे येत होते. कागवाडहून अथणी मार्गाने विजापूरकडे चिरा घेऊन येणार्या ट्रकमध्ये आणि या टेम्पोमध्ये मुरगुंडी येथील ओढ्याजवळ जोरदार धडक झाली. यात गाताडे आणि चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले.
याचदरम्यान अथणीहून मिरजेकडे जाणारे सचिन विलास माळी (रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) यांनी आपली स्कॉर्पिओ थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. मदत करत असताना अथणीहून कागवाडकडे येणार्या तिसर्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे गंभीर अवस्थेत असलेले शुभम चव्हाण व महेश गाताडे यांच्यासह मदत करणारे सचिन माळी या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी अथणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. अथणी जिल्हा उपरुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शुभम चव्हाणचे वडील युवराज चव्हाण हे ग्रामपंचायत शिपाई आहेत. घरच्या आर्थिक अडचणींना तोंड देत शुभम काम करत होता. त्याचप्रमाणे गाताडे कुटुंबाचीही आर्थिक परिस्थिती कठीण आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शिरोळ व मिरज तालुक्यात शोककळा पसरली आहे.
या घटनेत मानवसेवेची भावना दाखवणारे सचिन माळी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आपला जीव धोक्यात घातला. परंतु दुर्दैवाने ते स्वतःच या दुर्घटनेत सापडले आणि त्यांचा अंत झाला.