बेळगाव : काळाच्या पडद्यावर सरत्या वर्षाची चंदेरी किनार पुसत उत्साहाच्या उधळणीत ‘2026’ या नूतन वर्षाचा सूर्योदय झाला आहे. केवळ कॅलेंडरचे पान बदलले नाही, तर नववर्ष बेळगावकरांच्या डोळ्यांत नवी स्वप्ने आणि मनात नवी उमेद घेऊन आले आहे.
मध्यरात्रीच्या बाराच्या ठोक्याला जुन्या वर्षाला निरोप देत अख्खे शहर आनंदाच्या लाटेवर स्वार झाले होते. शहरासह उपनगरांतही उत्तररात्रीपर्यंत तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. विद्युत रोषणाईने सजलेली हॉटेल्स, ढाबे रात्री उशिरापर्यंत गजबजले होते. शहरासह बाहेरील लहान-मोठ्या हॉटेलांमध्ये ग्राहकांसाठी विशेष ऑफर होत्या. जेवणाच्या बेतासह करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल होती. नवे संकल्प, नवी स्वप्न, नव्या आशा आणि नव्या उमेदीसह मित्रमंडळी, कुटुंबीयांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेत नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.
शहर, उपनगरांत बुधवारी रात्री थर्टी फर्स्टनिमित्त सगळीकडे एकच चैतन्य सळसळत होते. कुठे ‘ओल्डमॅन’चे दहन करून जुन्या स्मृतींना निरोप दिला गेला, तर कुठे फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीने नभांगण उजळून निघाले. डीजेच्या तालावर थिरकणारी पावले आणि ’हॅप्पी न्यू इयर’चा एकच जयघोष वातावरणात गोडवा निर्माण करत होता. नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाईमध्ये सळसळता उत्साह होता. पार्ट्या खऱ्या अर्थाने रात्री आठनंतर सुरू झाल्या. रात्री बारा वाजता गल्लोगल्लीत ओल्डमॅनच्या प्रतिकृतींचे दहन करुन आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
शहरातील तरूण मंडळांनी ओल्डमॅनच्या 10 ते 25 फुटांपर्यंत भव्य प्रतिकृती तयार केल्या होत्या. रात्री बारा वाजता ओल्डमॅनची होळी करून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रात्री बारानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचे संदेश फिरत होते. नववर्षाची सुरूवात झाल्यानंतर अनेकांनी सामूहिक भोजन केले. यावेळी शहर, उपनगरातील रस्त्यांवर तरूणाईची वर्दळ दिसत होती. शहरासह ग्रामीण भागातील अनेक तरूणांनी पर्यटनस्थळावर नववर्षाचे स्वागत केले. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. रात्री बारानंतरही विविध रस्त्यांवर वर्दळ दिसत होती. तरूणांची हुल्लडबाजी टाळण्यासाठी पोलिसांची करडी नजर ठेवली होती.
चिकन, मटणाचा उच्चांकी खप
थर्टी फर्स्टनिमित्त हॉटेलमध्ये तसेच खासगी पार्ट्यांसाठी मांसाहारी जेवणाचा बेत होता. त्यामुळे मटण, चिकन, माशांना मोठी मागणी होती. शहर परिसरातील मटण व चिकन दुकानात सकाळपासूनच खरेदीसाठी हॉटेल व्यावसायिक आणि खवय्यांची लगबग होती. दुपारनंतर मटण, चिकन दुकानांत गर्दी वाढली होती.