महाराष्ट्र एकीकरण समिती (Pudhari File Phpoto)
बेळगाव

Belgaum news : म. ए. युवा समितीची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी ; अन्याय थांबविण्याचे आवाहन

मराठी विद्यार्थी आणि शाळांवरील अन्याय तसेच कन्नडसक्ती दूर होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करू, असा इशारा त्यांनी दिला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शैक्षणिक जिल्ह्यातील मराठी शाळांमध्ये मूल्यशिक्षण अभ्यासक्रमाची पुस्तके कन्नडमधून देण्यात आली आहेत. त्याला मराठी भाषिकांतून तीव्र विरोध होत आहे. मराठी शाळांमध्ये सुरू असलेली ही कन्नडसक्ती व मराठी विद्यार्थ्यांवर होणारा शैक्षणिक अन्याय थांबवावा. तसेच मूल्यशिक्षणाची पुस्तके मराठीतून द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मंगळवारी (दि. ९) बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

मराठी शाळांतून अद्याप काही पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारने यंदापासून क्रीडा शिक्षणासोबत मूल्यशिक्षण विषय सुरू केला आहे. पहिली ते दहावीपर्यंत हा विषय शिकवला जाणार आहे. पण, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी या विषयाची पुस्तके मराठीतून उपलब्ध करून न देता कन्नड आणि इंग्रजीतून उपलब्ध करून दिली आहेत. हे भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. मराठी भाषेत पुस्तके उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मराठी शाळांमध्ये हा विषय शिकवला जाऊ नये.

मराठी भाषेतून या विषयाची पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या अनुपस्थितीत राजपत्रित सहाय्यक जे. प्रकाश यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष वासू सामजी, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, युवा नेते आर. एम. चौगुले, मदन बामणे, सुनील बाळेकुंद्री, किरण हुद्दार आदी उपस्थित होते.

अधिकारी गायब

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास आल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ कार्यालयात उपस्थित नव्हत्या. वरिष्ठ अधिकारीही अनुपस्थित होते. याबाबत त्यांच्याकडे उत्तर नव्हते. समितीचे कार्यकर्ते येणार म्हणून अधिकारी जाणीवपूर्वक आले नसल्याचा आरोप मदन बामणे यांनी केला. मराठी विद्यार्थी आणि शाळांवरील अन्याय तसेच कन्नडसक्ती दूर होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करू, असा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT