

सिंधुदुर्गनरी : नियमबाह्य पद्धतीने तीन अपत्ये असणाऱ्या संजय राठोड यांना मुख्याध्यापक पदावर कोणी बसवले? अशा वादग्रस्त लोकांमुळेच जिल्ह्यात 'बीड पॅटर्न' घुसला असून अर्ध्या तालुक्याचं या शिक्षण यंत्रणेने वाटोळं केलं आहे, अशा कडक शब्दांत सदस्य प्रमोद रावराणे यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरण आणि उंबर्डे हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्तीवरून जि. प. शिक्षण समिती सभेत जोरदार चर्चा झाली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सभापती प्रितेश राऊळ यांनी परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याचे तसेच हा विषय थेट स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश दिले.
जि प. शिक्षण समिती सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. १८ मे पासून विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी स्पष्ट केले. या सभेत दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. मात्र, त्यानंतर वैभववाडीतील गैरप्रकारांवरून सदस्यांनी अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली.
अर्ध्या तालुक्याचं या यंत्रणेनं वाटोळं केलं : प्रमोद रावराणे
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षा केंद्रावर झालेल्या कॉपी प्रकरणावरून जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. आमच्या शाळेत कॉपी झाली हे सिद्ध झालं, तर आमच्या शाळेची मान्यता जाणार आणि केंद्रही बंद होणार. मग आपली यंत्रणा तिथे काय करत होती? लाईट गेली होती का? ही सगळी मिलीभगत आहे. अर्ध्या तालुक्याचं या शिक्षण यंत्रणेने वाटोळं केलं आहे, अशा कडक शब्दांत प्रमोद रावराणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.या गंभीर प्रकरणाची दखल घेत सभापती प्रितेश राऊळ यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील सर्वांना जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर आणा, परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज ताबडतोब ताब्यात घ्या आणि हा सर्व विषय स्थायी समितीसमोर ठेवा, असे सक्त आदेश सभापतींनी दिले.
तुम्ही चौकशी करायला सक्षम नाही का? अधिकाऱ्यांची भंबेरी!
या वादा दरम्यान शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकाऱ्याने, उत्तरपत्रिका सर्व बोर्डाच्या ताब्यात आहेत, त्यामुळे आम्ही नेमकी चौकशी कशी करणार? आम्ही फक्त अभिप्राय देऊ शकतो. ही चौकशी शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः केली तर अधिक बरं होईल, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावर प्रभारी शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब संतप्त झाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाहीर सभागृहात सुनावले की, तुम्ही चौकशी करण्यासाठी अधिकारी म्हणून सक्षम नाही का? तुम्ही सभागृहात जबाबदारीने बोलत जा. त्या शाळेची मंजुरी रद्द झाली, तर निष्पाप मुलांवर अन्याय होणार आहे. ज्याने हे कृत्य केलं त्याला शासन झालंच पाहिजे.यावर सभापती प्रितेश राऊळ यांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले की, उद्याच्या उद्या संबंधित परीक्षा केंद्राला तात्काळ भेट द्या आणि अहवाल सादर करा.
'त्या' मुख्याध्यापकामुळेच वैभववाडीत कॉपीचा प्रकार; मूळ उंबर्डे हायस्कूलमध्ये!
उंबर्डे (ता. वैभववाडी) हायस्कूलच्या मुख्याध्यापकाबाबत तक्रारी आहेत का? असा प्रश्न प्रमोद रावराणे यांनी विचारला. त्यावर उपस्थित महिला अधिकाऱ्यांनी सांगितले , तिथे संजय राठोड नावाचे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांना तीन अपत्ये असल्याची तक्रार आहे. यावर श्री. रावराणे म्हणाले, नियमबाह्य असतानाही त्यांना मुख्याध्यापक कसे करण्यात आले? ते नसते तर वैभववाडीत कॉपीचा हा प्रकार घडलाच नसता. या प्रकरणाचे मूळ याच ठिकाणी आहे. हा सगळा 'बीड पॅटर्न' जिल्ह्यात सुरू झाला आहे. यावर सभापती प्रितेश राऊळ यांनी येत्या शुक्रवारी उंबर्डे शाळेला भेट देऊन माहिती घेण्याचे आणि थेट कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. कणकवली तालुक्यातील एका हायस्कूलमधील बारावीच्या ४ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवल्याबाबत संस्थाचालकांना नोटीस दिली असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले, यावेळी मुलांचे नुकसान होऊ नये,त्यादृष्टिने कार्यवाही करा, अशी सूचना सभापतींनी केली.
दोडामार्ग गटशिक्षणाधिकाऱ्यांवर 'बिनकामाचा' आरोप
जिल्ह्यातील धोकादायक शाळांबाबत बोलताना कुडाळ तालुक्यात १५ शाळांची तातडीने दुरुस्ती आवश्यक असून माणगाव नंबर २ (६५ पटसंख्या) या शाळेची दुरुस्ती अती तातडीने करणे गरजेचे आहे, तर दोडामार्ग तालुक्यात ६ शाळा धोकादायक असल्याचे सांगण्यात आले.यावर जि. प. सदस्य रामा गवस यांनी आरोप केला की, जिल्ह्यात अनेक शाळा नादुरुस्त आहेत, पण गटशिक्षणाधिकारी याची वेळेत माहिती घेत नाहीत. दोडामार्गचे गटशिक्षणाधिकारी पूर्णपणे बिनकामाचे आहेत. ते केवळ शिक्षकांच्या बदल्या करण्यात मग्न असतात. शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी यावर सर्व शाळांची 'स्पॉट व्हिजिट' करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या, तर सभापती प्रितेश राऊळ यांनी, शाळा दुरुस्तीचे काम गांभीर्याने घ्या, यात कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असा सक्त इशारा दिला.