बेळगाव : महापौर मंगेश पवार यांच्यावर प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. पण, स्थगितीचे पत्र अद्याप महापालिकेला मिळाले नसले तर नगरविकास खात्याच्या सुचनेनुसार महापौर पवार गुरुवारी (दि. 3) महापालिकेत पुन्हा रुजू झाले.
महापौर पवार यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला बंगळूर उच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिली आहे. त्यामुळे, मंगळवारी ते महापालिकेत रुजू होतील, असा अंदाज होता. पण, महापालिकेला अद्याप निकालाची प्रत मिळाली नसल्यामुळे मंगळवारी त्यांना कक्षाचा आणि वाहनाचा वापर करता आला नाही. तशी माहिती कौन्सिल विभागाने महापौर पवार यांना माहिती दिली होती. पण, महापौरांच्या कक्षासमोरील झाकलेला नामफलक पुन्हा खुला करण्यात आला होता. त्यामुळे, आज तरी महापौर रुजू होतात की नाही, याबाबत महापालिकेत उत्सुकता होती.
गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त शुभा बी. यांना नगरविकास खात्याकडून सूचना करण्यात आली. अपात्रतेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सोमवारी (दि. 7) त्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे, निकालाची प्रत मिळाली नसली तरी कक्ष आणि वाहन त्यांना देण्यात यावे, असे सांगण्यात आले. त्यानुसार सकाळी महापौरांच्या घराकडे वाहन पाठविण्यात आले होते. दुपारी तीनपासून महापौर मंगेश पवार आपल्या कक्षात दाखल झाले होते.
महापौर पवार यांनी गुरुवारी आनंदनगर घरांत सांडपाणी शिरले आहे. त्याची पाहणी करुन बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सूचना केल्या. आता महापौर पवार यांना वाहन आणि कक्ष दिला असला तरी सोमवारी होणार्या सुनावणीकडे पुन्हा नजरा लागून राहिल्या आहेत.