बेळगाव : कानडीकरणाच्या फतव्यामुळे मराठी भाषिकांच्या हक्कांची पायमल्ली करण्याची कोणतीही संधी महापालिकेतील सध्याचे प्रशासन सोडत नाही. महापालिका अस्तित्वात आल्यापासून महापौर, उपमहापौरांच्या वाहनांवर असलेला मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतील फलक गुरुवारी (दि. 10) हटवून तो केवळ कन्नड भाषेत करण्यात आला. या प्रकारातून कानडी प्रशासनाने आपला कंडू शमवून घेतला आहे.
महापालिकेने त्रिभाषा धोरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे, महापालिकेत मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत नामफलक, विभागांचे फलक आणि कागदपत्रे देण्यात येत होती. महापालिकेत म. ए. समिती नगरसेवकांची सत्ता असेपर्यंत हे भाषिक सौहार्द जपण्यात आले. पण, आता कानडीकरणाचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यामुळे, महापालिकेचे पूर्णपणे कानडीकरण करण्यात आले आहे. त्यातून महापौर, उपमहापौर यांचे वाहनही सुटलेले नाही.
महापौर, उपमहापौरांच्या वाहनांवरील तिन्ही भाषेतील फलक हा बेळगावातील भाषिक सौहार्दाचा विषय होता. या ठिकाणी राहणार्या सर्व भाषिकांचे प्रतिनिधित्व करण्यात येत होते. पण, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर झपाट्याने कानडीकरण करण्यात आले आहे. राज्याच्या सचिव शालिनी रजनीश यांनी काढलेल्या आदेशाचा डांगोरा पिटत कन्नडचा वरवंटा फिरवण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून महापालिकेत कन्नड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या बैठकीमुळे सर्व काही कन्नडमध्ये करण्यात आले आहे. त्यामध्ये आता महापौर, उपमहापौरांच्या वाहनांवरील नामफलकही हटवण्यात आला आहे. त्याठिकाणी केवळ कन्नड भाषेतील फलक लावला आहे. शिवाय वाहनाचे क्रमांकही कन्नडमध्येच लिहिण्यात आले आहे. या मराठीद्वेषाच्या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मंगेश पवार हे मराठी असून भाजपचे अनेक नगरसेवक मराठीच आहेत. पण, महापालिकेत राजरोजपणे कानडीकरण करण्यात येत आहे. त्याविरोधात या नगरसेवकांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे, महापौर पवार तरी आपली भूमिका काय आहे, हे स्पष्ट करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापौरांच्या वाहनावर सुरुवातीपासूनच भगवा ध्वज होता. जोपर्यंत महापालिकेत म. ए. समितीची सत्ता होती. तोपर्यंत महापौरांच्या वाहनावरील भगवा ध्वज हटवण्यात आला नाही. पण, ज्यावेळी कन्नड महापौर झाला. त्यावेळी पहिल्यांदा भगवा ध्वज हटवण्यात आला. त्यानंतर आता महापौरांच्या वाहनावरील मराठी अक्षरेही हटवण्यात आली आहेत. यातून मराठी भाषा आणि त्यांच्या भावना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न राजरोसपणे होताना दिसत आहे.