जितेंद्र शिंदे
बेळगाव : मुंबईत झालेले मराठा आरक्षण आंदोलन आणि आता राज्यात सुरू असलेली जातनिहाय शैक्षणिक आणि सामाजिक गणना, यामुळे सीमाभागातील मराठा समाज कुणबी उपजात नोंदीसाठी जागरूकता करत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व मराठे हे कुणबीच आहेत, अशी नोंद 1883 च्या मुंबई गॅझेटमध्येच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या कुणबी नोंदीच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले आहे.
राज्यात जात गणना सुरू होण्याआधीपासूनच मराठा समाजाकडून या गणनेत मराठा समाजाने जात म्हणून मराठा, उपजात म्हणून कुणबी आणि मातृभाषा म्हणून मराठी असे लिहावे, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वपक्षीय मराठा समाज एकवटला आहे. विविध ठिकाणी जागृती करण्यात येत आहे. कुणबी समाज हा ओबीसीमध्ये असल्यामुळे याचा लाभ मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये होऊ शकतो, असे पटवून देण्यात येत आहे.
सीमाभागातील मराठा समाजाच्या या प्रयत्नांना आता मुंबई गॅझेटचे पाठबळ मिळाले आहे. मुंबई म्हणजेच तत्कालीन बॉम्बे गॅझेट 1883 मध्ये बेळगावच्या मराठा समाजाबाबत ठळक उल्लेख आहे. 1881 च्या गणनेवर हे गॅझेट आधारित आहे. या गॅझेटमध्ये बेळगाव जिल्ह्यातील मराठा जातीची लोकसंख्या 11,93,000 असून हे या जिल्ह्यात सर्वत्र आढळून येतात. ते पवित्र जानवे घालतात आणि हिंदू धर्माप्रमाणे पवित्र आचारविचार पाळतात. शेती करणार्या मराठा समाजाला कुणबी म्हणतात. मराठा जातीच्या वराशी कुणब्याच्या मुलींचे लग्न होण्यास हरकत येत नाही. तसेच गरीब मराठ्यांची मुलगी श्रीमंत कुणब्यांच्या मुलाला देतात. मराठा जातीचे लोक फार मेहनती, मजबूत, चिवट हाडाचे आणि संभावित असतात. परंतु, त्यांचा स्वभाव गरम असतो. ते शूर आणि राजनिष्ठ शिपाई आहेत. ते जमीनदार, शेतकरी, वकील, व्यापारी, शिपाई, मजूर, कारकून, पट्टेवाले आणि साधे नोकर या धंद्यात आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो कुणबीच असल्याचे मुंबई आणि सातारा गॅझेटवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता होत असलेल्या जात गणनेत जात मराठा, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी अशी नोंद करणे आवश्यक आहे. येणार्या पिढीच्या शैक्षणिक आणि रोजगाराच्या मदतीसाठी सर्व मराठा समाजाने जागरुकतेने नोंद करावी.प्रकाश मरगाळे, संयोजक, सकल मराठा समाज