Belgaum Legislative session Hate speech
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
प्रचंड गदारोळ, आरोप-प्रत्यारोप, तब्बल सहा तास गोंधळात झालेली चर्चा अशा वातावरणात विरोधकांचा विरोध झुगारुन राज्य सरकारने हेट स्पीच व हेट क्राईम विधेयक शुक्रवारी (दि. १९) विधान परिषदेत मंजूर करवून घेण्यात यश मिळविले..
विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, सी. टी. रवी यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी विधेयकाचा जोरदार निषेध करत आपली बाजू मांडली. त्याला सत्ताधा-यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे, विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधकात दिवसभर खडाजंगी पाहायला मिळाली.
विधेयकावर बोलताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, हेट स्पीच व हेट क्राईममुळे देशासह राज्यातील बातावरण कलुषित होत आहे. गेल्या काही वर्षात तर अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हे लोकशाहीला हानीकारक आहे. युवकांची माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. या व्देषपूर्ण व प्रक्षोभक भाषणांमुळे अनेक युवक गुन्हेगारी क्षेत्राकडे बळले असून मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. याचे परिणाम खूप गंभीर असून युवकांचे आयुष्य पणाला लागत आहे. त्यामुळे, व्देषपूर्ण भाषण व गुन्ह्यांवर राज्यात आळा बसावा. भविष्यात असे गुन्हे होऊ नयेत. जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे केली जाऊ नयेत, यासाठी हेट स्पीच व हेट क्राईम हे विधेयक आणले आहे. ते मंजूर करावे अशी विनंती त्यांनी सभापती बसवराज होरट्टी यांच्याकडे केली.
त्याला विरोधी पक्षनेते नारायणस्वामी, सदस्य रवी यांच्यासह सर्व विरोधी पक्षातील सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. राज्य सरकारचा हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा आहे. हे विधेयक म्हणजे मनमानीपणा आहे.
विधेयकाच्या माध्यमातून व्यक्ती संस्थांबरोबरच प्रसार माध्यमांनाही टार्गेट करण्यात आले आहे. सदर विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे, पोलिस हिटलरसारखे वागतील. सदर कायदा अमलात आणल्यास जाणूनबुजून एखाद्या विरुध्द सूडबुद्धीने वागण्याची शक्यता असल्याचे म्हणत या विधेयकाला जोरदार निषेध केला.
वास्तविक सकाळी ११ वाजता या विधेयकावर चर्चेला प्रारंभ झाला होता. मात्र, सत्ताधारी व विरोधकांतील आरोप-प्रत्यारोप वाढल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. दुपारी ११.४० दरम्यान सभापती होरट्टी यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा या विधेयकावर चर्चा करण्यात आली. तब्बल सहा तास दोन्ही पक्षातील सदस्यांत खडाजंगी होत होती. अखेर सायंकाळी ५.३० च्या सुमारास गोंधळातच विधेयक मंजूर करण्यात आले.