बेळगाव : मालमत्तेच्या वादातून वकिलांनीच वकिलाचे अपहरण करून खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील सवसुद्दी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एक ज्येष्ठ वकील, त्याचे दोघे सहायक वकील यांच्यासह दहाजणांवर गुन्हा दाखल केला. यापैकी आठजणांना अटक केली असून दोघे फरारी असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. संतोष अशोक पाटील (वय 32, रा. सवसुद्दी, ता. रायबाग) असे मृत वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये अॅड. शिवगौडा बसगौडा पाटील (47, सवसुद्दी, ता. रायबाग), अॅड. भरत कल्लाप्पा कोळी (वय 26, बस्तवाड, ता. रायबाग), अॅड. किरण वसंत केंपवाडे (27, बिरनाळ, ता. रायबाग) महावीर सुभाष हंजे (रा. अळगवाडी), सुरेश भीमाप्पा नंदी (19, (चंदूर, ता. बेळगाव), उदय भीमाप्पा मुसेन्नवर (23, गुजनाळ, ता. गोकाक), संजयकुमार यल्लाप्पा हळबन्नवर (27, वण्णूर, ता. बैलहोंगल), रामू भीमाप्पा दंडापुरे (33, गजमनाळ, ता. बैलहोंगल), मंजुनाथ बसवराज तळवार (23) व नागराज बसाप्पा नायक (दोघेही रा. होनीहाळ, ता. बेळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी महावीर हंजे व नागराज नायक हे फरारी असून उर्वरित 8 जणांना अटक केली आहे.
डॉ. गुळेद म्हणाले, 29 एप्रिल रोजी रेखा संतोष पाटील (रा. सवसुद्दी, ता. रायबाग) यांनी रायबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यामध्ये आपले पती अॅड. संतोष अशोक पाटील हे दुचाकीवरून रायबाग न्यायालयात जात होते. यावेळी त्यांचे अॅड. शिवगौडा बसगौडा पाटील व त्याचा ज्युनिअर वकील भरत कल्लाप्पा कोळी यांनी अपहरण केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी याची नोंद घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
आपला अपहृत पती सापडत नसल्याचे सांगत पत्नीने याचा सातत्याने पाठपुरावा केला असता पोलिसांनी तपास गतीने सुरू केला. दीड महिन्यापूर्वी कारवार जिल्ह्यातील गणेशगुडी जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह ताब्यात घेऊन याची डीएनए चाचणी केली असता तो अॅड. संतोष पाटील यांचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला.
अॅड. संतोष पाटील व संशयित अॅड. शिवगौडा पाटील यांच्यात 1 एकर 4 गुंठे शेतजमिनीचा वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन अॅड. संतोष पाटील यांनी अॅड. शिवगौडा पाटील याच्याविरोधात रायबाग न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. त्यामुळे चिडलेल्या शिवगौडा याने आपल्या दोघा ज्युनिअर वकिलांना सोबत घेऊन खुनाचा कट रचला. यानंतर या खुनाची सुपारी अन्य सात जणांना दिली. ज्या दिवशी अॅड. संतोष पाटील बेपत्ता झाले त्याच दिवशी त्यांचे सवसुद्दीहून रायबागला दुचाकीवरून जाताना रस्त्यात कार आडवी लावत अपहरण करून कारमध्ये घातले. येथून त्यांना गणेशगुडी (ता. जोयडा, जि. कारवार) येथे नेले. तेथे नेऊन त्यांच्या डोकीत तलवारीने वार करून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल ओतून मृतदेह जाळून तो जंगल भागात फेकून दिला. अथणीचे उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे निरीक्षक बाळाप्पा मंटूर, उपनिरीक्षक शंकर मुकरी व त्यांच्या सहकार्यांनी याचा शोध घेतला.
मृत संतोष पाटील याचा भाऊ लक्ष्मण पाटील हादेखील वकील होता. तो शिवगौडा पाटील याचा ज्युनिअर म्हणून काम करत होता. शिवगौडा हा वादात असलेली मालमत्ता शोधून ती संबंधितांना मिळवून देण्याचे काम करत असे. अशीच एक शेतजमीन त्याने आपला ज्युनिअर असलेला व मृत संतोष पाटीलचा भाऊ लक्ष्मण याच्या नावे केली होती. परंतु, अॅड. लक्ष्मण पाटील याचा कोरोना काळात अचानक मृत्यू झाला. ही मालमत्ता आपल्या भावाच्या नावे असून ती आपल्या कुटुंबाला मिळावी, यासाठी संतोष पाटीलने न्यायालयात दावा दाखल केला होता. मालमत्ता आपली असताना त्यावर संतोष पाटील हा दावा करत असल्याचा राग अॅड. शिवगौडा याला होता. त्यांच्या घरात हा एकटाच हुशार आहे, याला संपवले तर आपली मालमत्ता आपल्याला मिळेल, यातूनच शिवगौडाने या खुनाचा कट रचला आणि यात तो स्वतःच सापडला.