बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व कुद्रेमानी गावकरी आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवार, दि. 28 रोजी होणार आहे. कुद्रेमानी हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षपदी कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार राहणार आहे. दुसऱ्या सत्रात कोल्हापूर येथील हास्यकलाकार नितीन कुलकर्णी यांचा चला हासू या कार्यक्रम होणार आहे. दुपारनंतर तुंग (सांगली) येथील भुपाळी ते भैरवी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार
मराठी साहित्यात कवी, लेख, समीक्षक म्हणून प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार हे ओळखले जातात. ते मूळचे नेज (ता. हातकणंगले) येथील असून हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण पदवी महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत्त असून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे आत्म्याचा अभंग, तरीही सोबतीला असतात श्वास, स्वप्नांच्या पडझडीनंतर, वर्तमान आणि मी : काही संदर्भ आदी कवितासंग्रह, आस्वादाची काही पाने, मौनातले अक्षरधुके, सृजनगंध, अक्षरलिपी, परिघाच्या रेषेवर, प्रहराच्या ऐरणीवर आदी समीक्षा ग्रंथ, त्याचबरोबर संपादने प्रसिद्ध आहेत.
नितीन कुलकर्णी
नितीन कुलकर्णी हे मूळचे कुडित्रे (ता.करवीर) येथील असून शेती, लेखन, अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी देखणी बायको नाम्याची, गाव एक नंबरी, राजा पंढरीचा, चल गंमत करू, आबा झिंदाबाद, सासूची माया, संभा, रामदेव आले रे बाबा, रिकामटेकडे, कोणी मुलगी देते का मुलगी, पकडापकडी, सासरची का माहेरची, नाथा पुरे आता, भैरू पैलवान की जय हो, झुंजार, खबरदार, सगळे करून भागले, राजमाता जिजाऊ, माचीवरला बुधा आदी चित्रपटात अभिनय केला आहे. तर सासूची माया, सासू आली अडचण झाली, वेलकम टू जंगल या चित्रपटांचे लेखन केले आहे. त्यांना करवीर रत्न, युवा गौरव, कला पंढरीनाथ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
भूपाळी ते भैरवी
तुंग (ता. मिरज) येथील भूपाळी ते भैरवी प्रतिष्ठानतर्फे काळाच्या ओघात हरवत चाललेल्या मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार असणारा भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये 20 हून अधिक कलाकारांचा समावेश असून भूपाळी, ओवी, व्हनार, हेळवी, वासुदेव, बहुरुपी, कडकलक्ष्मी, गवळण, भारुड, शाहिरी, बतावणी, लावणी, गोंधळ, नंदीबैल, पोतराज, धनगरी ओवी, शेतकरी, गजनृत्य, कोळीनृत्य, दिंडी, कीर्तन, बैलपोळा, गुढी पाडवा, भैरवीचे सादरीकरण गीतांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात येणार आहे.