बेळगाव : मुख्य बसस्थानकातून बेळगावहून खानापूरला प्रवासी घेऊन रवाना झालेली बस भर रस्त्यातच बंद पडल्याचा प्रकार गुरुवारी (दि.11) सकाळी शासकीय विश्रामगृहाजवळ घडला. त्यामुळे काही काळ रहदारीची कोंडी झाली. रहदारी पोलिस व प्रवाशाच्या मदतीने बस रस्त्याच्या कडेला लाऊन रहदारीची कोंडी फोडण्यात आली. खानापूरला जाण्यासाठी बसमध्ये चढलेले प्रवासी अन्य बसने खानापूरला रवाना झाले.
वायव्य परिवहन मंडळाकडून कालबाह्य बसचा वापर केला जात आहे. दोन वषार्ंपूर्वी बंगळूर आगारातून भंगारात काढलेल्या 20 बस वायव्य परिवहन मंडळाने शहरात वापरण्यासाठी आणल्या. मात्र या बस प्रवासी वाहून नेताना ठिकठिकाणी बंद पडत आहेत. गुरुवारी मुख्य बसस्थानकातून खानापूरला निघालेली बस बंद पडली. ती चालू करण्यासाठी परिवहन मंडळाच्या मॅकनिकनी प्रयत्न केला. मात्र बस सुरु झाली नाही.
रस्त्यातच बस बंद पडल्याने रहदारीची कोंडी वाढली. ती कोंडी फोडण्यासाठी वाहतूक निरीक्षक पोलिसाने स्थानिकांच्या मदतीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यापूर्वीही परिवहन मंडळाच्या बस अशोक सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, केएलई रोड या ठिकाणी बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत.
बेळगाव आगारात गतवर्षी नवीन 20 इलेक्ट्रिक बस आगारात आणण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप या नवीन बस आगारात दाखल न झाल्याने जुन्या बसवरच बेळगाव आगारातील तिन्ही डेपोचा कारभार चालला आहे.