बेळगाव : महिला कार्यकर्त्यांना पुढे करून मराठी फलक फाडून टाकण्याचा संतापजनक प्रकार कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 26) केला. मराठी भाषेची कावीळ झालेल्या या कन्नड कार्यकर्त्यांनी मजगाव येथे दुभाजकावर लावलेले फलक हटवून कंडू शमवून घेतला आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी अनगोळ येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या जागृतीसाठी त्यांनी अनगोळ, मजगाव परिसरात फलक उभारले आहेत. पण, हे फलक मराठी भाषेत असल्यामुळे तीळपापड झालेल्या मूठभर कार्यकर्त्यांच्या कन्नड संघटनांनी महिला कार्यकर्त्यांना पुढे करून फलक फाडले.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील मराठी भाषेतील फलकांना लक्ष्य करण्यात येत आहे. अधिवेशन काळात कन्नड आणि मराठी भाषेत लिहिलेले फलकही काढून कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला होता. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. शुक्रवारी मजगाव येथील रस्त्याच्या दुभाजकावर उभारलेले फलक आकस बुद्धीने फाडण्यात आले. हे सारे होत असताना पोलिस मात्र नावाला विरोध करत होते. मराठी भाषेवरील आकस यातून व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार वेळीच रोखणे आवश्यक होते. रक्तदान शिबिरासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची माहिती फलकावर लिहिली असली तरी ते केवळ मराठीत असल्यामुळे फाडण्याचा प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.