बेळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला असून परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. तर लेंडी नाला फुटल्यामुळे शिवारे पाण्याने भरली आहेत. त्यामुळे, दोन्ही नाल्यांच्या परिसरातील हजारो एकर जमिनीतील पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे खाते आणि जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका अखेर शेतकर्यांना बसला आहे.
बळ्ळारी असो वा लेंडी नाला शेतकर्यांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागत आहे. पाटबंधारे खात्यासह जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकर्यांवर दरवर्षीच संकट कोसळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा फटका सहन करावा लागत आहे. दोन्ही नाल्यांची खोदाई व दुरुस्तीसाठी अनेकदा आंदोलने करुन निवेदने देण्यात आली. मात्र, आश्वासनांपलीकडे काहीच हाती लागलेले नाही.
शहरातील पाणी लेंडी नाल्याद्वारे बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळते. मात्र, अतिक्रमणांमुळे लेंडी नाला अरुंद झाला आहे. या नाल्याची खोदाईसुद्धा केलेली नाही. त्यामुळे, नाल्याचे पाणी राष्ट्रीय महामार्गाशेजारी जाऊन तुंबत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसामुळे परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. हलगा-मच्छे बायपासचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्त्याची उंची वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भर टाकण्यात आला आहे. त्यामुळे, बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुराच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. पूर्वीपेक्षाही अधिक पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे.
बायपासच्या कंत्राटदाराने पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शिवारात पाणी साचून भात पीक कुजून गेले आहे.