बेळगाव : शहर परिसरात अमली पदार्थ विक्री करणार्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. रविवारी (दि. 29) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपयांचे गांजा व हेरॉईनसह वाहने जप्त केली.
सीसीबी पोलिसांनी एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर-कंग्राळी बुद्रूक मुख्य रस्त्यावर कारमधून गांजाची विक्री व वाहतूक करणार्याला अटक केली. मनोहर ऊर्फ बाळू गजानन हुद्दार असे त्याचे नाव आहे. मनोहर कारमधून (एमएच 02 एएल 4379) गांजा विक्री आणि वाहतूक करत असल्याची माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली.
सीसीबीचे पोलिस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून 88,700 रुपये किंमतीचा 3.500 किलो गांजा व एक मारुती एस्टीम कार आणि रोख 3,700 रुपये जप्त केले. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, हवालदार आय. एस. पाटील, एस. बी. पाटील, ए. एन. रामागुनट्टी, जगदीश हादीमणी, अमरनाथ दंडीन आणि सचिन शिंदे, एम. एस. पाटील, एस मुगळखोड यांनी कारवाईत भाग घेतला.
रुक्मिणीनगरमध्ये काहीजण हेरॉईन विक्री करत असल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली होती. त्यांनी छापा टाकला असता रेहान महमदगौस रोटीवाले (रा. आंबेडकरनगर, सदाशिवनगर), गणेशकुमार अनिल नागने (रा. ओजेवाडी, ता. पंढरपूर, महाराष्ट्र), सय्यदपनीश गुलाबअहमद अंगरशा (रा. सुभाषनगर, बेळगाव), आदित्य राजू पडळकर (रा. सांगली), मोहम्महुसेन ऊर्फ नूरअहमद इनामदार (रा. रुक्मिणीनगर, बेळगाव) हेरॉईन विकत असल्याचे आढळून आले.
त्यांच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे 30 गॅ्रम हेरॉईन जप्त करण्यात आले. या सर्वावर मार्केट पोलिस ठाण्यात कलम 21 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.