बेळगाव : शाळेला जाताना कुत्र्याने चावा घेतला. त्यात किरकोळ जखमी झालेल्या सातवर्षीय विद्यार्थ्याने ही घटना घरात सांगितली नाही. मात्र, काही दिवसांनी रेबीज झाल्याने त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 12) निपनाळमध्ये (ता. रायबाग) घडली. मुत्तू श्रीनाथ खानापुरे (वय 7 रा. निपनाळ ता. रायबाग) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मुत्तूला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. मात्र, ही बाब किरकोळ असल्याचे समजून त्याने घरच्यांना याबद्दल काहीही सांगितले नाही. काही दिवसांनी तो विचित्र वागू लागला. घरच्यांनी त्याला मुडलगीतील खासेगी रुग्णालयात दाखविले. डॉक्टरांनी कुत्रा चावल्याचा संशय व्यक्त करुन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा शनिवारी मृत्यू झाला आहे.
केवळ दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. रेबिज हा आजार एकदा झाला तर त्याच्यावर उपचार करणे अवघड असते. त्यामुळे, कुत्रा चावल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे.