विजापूर : एका डॉक्टराने सोने आणि पैशांसाठी पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आले आहे. शहरातील गौरीशंकर वसाहतीत ही घटना घडली. पतीने व कुटुंबीयांनी मिळून तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सविता शिरश्याड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बीएएमएस पदवीधर डॉ. राजशेखर शिरश्याड असे पतीचे नाव असून तो फरार झाल्याचे सांगितले जात आहे. सविताला हुंड्यासाठी छळले जात होते, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. सदर दाम्पत्याला दोन मुलगे आहेत.
लग्नावेळी दहा तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते आणि लग्नाचा संपूर्ण खर्चही आपणच केला होता. तरीही राजशेखर वारंवार सविताकडे पैसे व सोने आणण्याचा तगादा लावत होता. सण-उत्सवावेळीही तिच्यावर दबाव टाकला जात होता. राजशेखर विनाकारण सविताशी सतत भांडण करून माहेरी जाण्यास सांगत होता.
सविताचा मृत्यू कधी हृदयविकाराने तर कधी पायर्यांवरून पडल्याने झाला अशी खोटी कारणे सांगितली जात होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. सविताच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे. याप्रकरणी विजापूर शहर महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी राजशेखरचा भाऊ शरणकुमार याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. इतर सर्व संशयित फरार आहेत. पोलिस चौकशीनंतर या घटनेमागील सत्य समोर येणार आहे.