

बेळगाव : डोक्यात दगड घालून सख्ख्या भावाचा खून करुन तो छतावरुन पडून मृत झाल्याचे भासवले. मात्र, आईने अंत:करणातून सत्य बाहेर पडल्याने सख्ख्या भावानेच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली आहे. सिद्धप्पा विठ्ठल रामापुरे असे संशयिताचे तर बसलिंग विठ्ठल रामापुरे (दोघेही रा. बस्सापूर, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे.
सिद्धप्पा व मयत बसलिंग या दोन भावांमध्ये चार एकर जमिनीच्या वाटणीवरुन वाद होता. यातून बसलिंगने दारुच्या नशेत मोठ्या भावाबरोबर वाद घातला. यावेळी सिद्धप्पाने लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण करुन डोकीत दगड घातला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सिद्धप्पाने बसलिंगची पत्नी वीणाला सदर घटना कुणालाही सांगू नकोस अन्यथा जीवे मारु, अशी धमकी दिली. त्यामुळे, घाबरलेल्या वीणाने पती छतावरुन पडून मृत झाल्याचे सांगितले. त्यामुळे, पोलिसांनी 18 डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
मात्र, ही गोष्ट दोघांच्याही आईच्या जिव्हारी लागली. तिने ही बाब काहीजणांकडे बोलून दाखवली. त्यामुळे, परिसरात या संशयास्पद मृत्यूबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांनाही याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृत बसलिंगची आई रत्नव्वाला विश्वासात घेतले. तिने खुनाची खरी हकीकत पोलिसांना सांगितली. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने संशयित सिद्धप्पाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने आपल्या भावाचा खून केल्याची कबुली दिली.