बेळगाव ः बेळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अखत्यारीतील वाहनांची संख्या 7.56 लाखांवर पोचली आहे. त्यात दुचाकी, ऑटोरिक्षा, मालवाहू वाहने व बसेसचा समावेश आहे. त्यामुळे, रहदारी कोंडीत वाढ होण्याबरोबरच हवा व ध्वनी प्रदूषण आणि प्रदूषणाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे.
आरटीओच्या 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार विभागात 7,56,911 वाहने आहेत. त्यात सर्वाधिक 5,92,932 (78 टक्के) वाहने दुचाकी आहेत. उर्वरीत 32,961 वाहनांमध्ये खासगी बसेस 1,346, ट्रॅक्टर्स 7,681, कृषी ट्रेलर्स 3,558, बांधकामाशी संबंधित वाहने 876, रुग्णवाहिका 326, शालेय बसेस 335 व इतर वाहने 11,544 आहेत. रहदारी कोंडी व प्रदूषणात दुचाकींचा सिंहाचा वाटा आहे. नियमित देखभाल न केलेल्या दुचाकी सर्वाधिक प्रदूषण करतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात 59 प्रदूषण चाचणी केंद्रे (एमिशन टेस्टिंग सेंटर्स) असली तरी वेगाने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे ती तोकडी पडत आहेत.
एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास आरटीओने वाहन तपासणी व कारवाईत वाढ केल्याचे दिसून येते. 2025 मध्ये 7,859 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच काळात हा आकडा 6,684 होता. म्हणजेच त्यात 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रकरण नोंदविण्याचे प्रमाणही 23 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्यावर्षी 4,525 प्रकरणे नोंद झाली होती. यंदा ही संख्या 5,565 झाली आहे. चलनांच्या प्रमाणातही 28 टक्के वाढ झाली असून ही संख्या 2,821 वरून 3,599 झाली आहे. वाहन जप्तीही 38 वरुन 90 म्हणजेच तब्बल 137 टक्क्यांनी वाढली आहे. दंड आकारणीही 1.18 कोटींवरून 1.85 कोटी रुपयांवर पोचली आहे. प्रदूषण व सुरक्षितता नियमांची काटेकोर अंमलबजावणी वाढल्याने हे शक्य झाले आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांमध्येही वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दमा, श्वसनाचे आजार, ॲलर्जी, तीव्र खोकला आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुले, वृद्ध व रहदारी पोलिसांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. सतत प्रदुषित हवेत राहिल्यास फुफ्फुसांना नुकसान होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.