

उचगाव : उचगाव परिसरात मार्कंडेय नदीने तळ गाठला आहे. सुळगा येथील बंधाऱ्यात पाणी अडविले नाही तर आठ दिवसांत नदी पूर्णपणे कोरडी पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लघू पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी अडवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी म्हणून मार्कंडेय नदी ओळखली जाते. पश्चिम भागातील राकसकोपपासून हुदलीपर्यंत नदी वाहते. या टप्प्यात येणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांसाठी नदी उपयोगी ठरते. परंतु, यंदा नोव्हेंबरच्या मध्यावरच कोरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीने सध्या तळ गाठला असून केवळ एक ते दोन फूट पाणी वाहत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. नदीचा उगम खानापूर तालुक्यातील बैलूरमध्ये होतो. तेथून ही नदी राकसकोप, यळेबैल, सुरुते, सोनोली, शिनोळी, बेळगुंदी, बाची, तुरमुरी, उचगाव, सुळगा, मण्णूर, आंबेवाडी, हिंडलगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रूक, गौंडवाड, काकतीतून ही नदी पुढे वाहते. या गावांतील शेतकऱ्यांना नदी लाभदायक ठरते.
रब्बी हंगामात नदीतील पाण्याचा वापर करुन भाजी पिके घेतात. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नदीमध्ये विहिरींची खोदाई केली आहे. त्याचबरोबर नदीतील पाण्यामुळे भूजल पातळी वाढीसाठी मदत होते. परिणामी नदीच्या दोन्ही बाजूने पिके घेण्यात येतात. सध्या भात कापणी आणि ऊस तोडणीची कामे जोमात सुरु आहेत. सुगीची कामे आटोपताच भाजी लागवडीला वेग येणार आहे. परंतु, नदीने आताच तळ गाठल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. नदीवर सुळगा येथे फळ्या टाकून पाणी अडवण्यात येते. त्यानंतर अडविलेल्या पाण्याचा वापर फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांना होतो. सध्या नदीने तळ गाठला असून पाणी अडवावे, अशी मागणी होत आहे.