बेळगाव : खाऊकट्टाप्रकरणी सदस्यत्व रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात मंगेश पवार आणि जयंत जाधव सोमवारी (दि. 30) उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे, अपात्रतेच्या प्रकरणी आता न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे.
गोवावेस येथील खाऊ कट्ट्यात पत्नींच्या नावे गाळे घेतल्यामुळे महापौरपदावर असलेले मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्याविरोधात प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली होती. त्यांनी दोघांनाही अपात्र ठरवण्याचा आदेश दिला. या आदेशाविरोधात दोघांनीही नगरविकास खात्याकडे दाद मागितली होती. नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांनी शुक्रवारी (दि. 27) त्यांची याचिका रद्द करत प्रादेशिक आयुक्तांचाच आदेश कायम ठेवला. त्यामुळे, पवार आणि जाधव अपात्र ठरले आहे.
प्रादेशिक आयुक्त आणि नगरविकास खात्याने राजकीय दबावाखाली ही कारवाई केली आहे, असा आरोप करत भाजपने प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. तर वरिष्ठांशी झालेल्या चर्चेनुसार पवार आणि जाधव सोमवारी बंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे, न्यायालयाच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
अपात्रतेेचे प्रकरण नगरविकास खात्याकडे असताना महापौर, उपमहापौर निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पवार आणि जाधव यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी न्यायालयाने दोघांवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती देत महापौर निवडणुकीत सहभाग घेण्याची मुभा दिली होती. आता अपात्रतेच्या आदेशाला आव्हान देण्यात येणार असल्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
=अपात्रतेच्या निर्णयाला मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी याआधी नगरविकास खात्याकडे अपील याचिका दाखल केली होती. त्यावेळी तक्रारदार सुजीत मुळगूंद यांनी कॅव्हेट दाखल केले होते. आता पुन्हा दोघेही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्यामुळे त्याठिकाणीही कॅव्हेट दाखल होण्याची शक्यता आहे.
मंगेश पवार अपात्र ठरल्यामुळे महापौरपदाची जबाबदारी उपमहापौर वाणी जोशी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे; पण सभागृहात भाजपचे बहुमत असल्यामुळे भाजपच्या अन्य कोणत्याही नगरसेवकावर ही जबाबदारी देण्यात येण्याचीही शक्यता आहे.