बेळगाव ः शहरातील वाढती रहदारी कोंडी आणि पार्किंगची गंभीर समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. 7) झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी चन्नम्मा चौक, सम्राट अशोक चौक, न्यायालय आवार, शिवाजी उद्यान, गोगटे चौक आणि आरपीडी यासारख्या प्रमुख ठिकाणच्या वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला.
शहरातील विविध विभागांच्या रिकाम्या जागा आणि खासगी भूखंड ओळखून तिथे वाहन पार्किंगची सोय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून पे अँड पार्क सुविधा सुरू केली जाणार आहे. न्यायालय आवार, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जिल्हा उपनोंदणी कार्यालय, जिल्हा पंचायत या परिसरात रहदारीला अडथळे येत आहेत. त्यामुळे वाहनांसाठी इतर ठिकाणी सोय करण्यात यावी. सर्व सिग्नल सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रोशन यांनी केल्या. तसेच, शहरात प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यापूर्वी रस्ते सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी, रिक्षाचालकांनी केवळ नियुक्त थांब्यावरच रिक्षा उभ्या कराव्यात, असे आदेेश दिले. राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी-कोल्हापूर रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांनी सूचना केल्या. बैठकीला महापालिका आयुक्त एम. कार्तिक, जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेगनाईक, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ईश्वर गडादी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.