बेळगाव : शेतात पायवाट सोडण्यावरून अथवा अन्य कोणत्या तरी कारणातून दोघांनी एकाचा टॉवेलने गळा आवळून तसेच धारदार शस्त्राने खून करून केल्याची घटना हुलकुंदमध्ये (ता. रामदुर्ग) उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
प्रदीप ऊर्फ प्रधानप्पा दुर्गाप्पा पाट्रोट (वय २३, रा. हुलकुंद) रमेश कामाप्पा मेत्री (वय २५, रा. हुलकुंद) अशी संशयितांची नावे आहेत. रामदुर्गचे पोलिस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यमनाप्पा रामाप्पा गुडदप्पणावर (वय ४५, रा. हुलकुंद) यांचा ३१ मे रोजी रात्री ९.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा या काळात खून करण्यात आला होता.
आधी त्यांचा टॉवेलने गळा आवळण्यात आला. त्यानंतर धारदार शस्त्राने पोटावर, छातीवर तसेच शरीराच्या अन्य भागावर वार केल्याचे आढळून आले. या प्रकरणी मृताची पत्नी लक्ष्मणव्वा यांच्याकडून फिर्याद घेऊन याचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी याचा यशस्वी तपास करत दोघांना अटक केली.