Belgaum Crime: मित्रांनीच केला घात, लुटायला गेले आठ ­

किणयेजवळच्या लुटीचा भांडाफोड : दोघा मित्रांनी दिली लुटीची सुपारी; आठ जणांना अटक
Belgaum Crime: मित्रांनीच केला घात, लुटायला गेले आठ ­
Published on
Updated on

बेळगाव : आपल्यावर झालेले कर्ज कमी करण्यासाठी व चैनीसाठी पैसे हवे असल्याने आपल्या धनवान मित्रालाच लुटण्याची सुपारी देणाऱ्या टोळीचा भांडाफोड खानापूर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी फिर्याददाराच्या दोघा मित्रांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. २० मेरोजी घडलेल्या या घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

फिर्याददार एस. के. इबादुल (मूळ रा. ठाकूर हाट, सिंगूर-प. बंगाल, सध्या रा. जोशी गल्ली, शहापूर) गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावात वास्तव्यास आहेत. ते सुवर्ण कारागीर म्हणून काम करतात. त्यांचे पश्चिम बंगालचेच दोघे मित्र आहेत. रबीयुल रोहूल अमीन घाजी (वय २९, मूळ रा. प. बंगाल, सध्या रा. दाणे गल्ली, शहापूर) व अलीहुसेन कबरुद्दिन मंडल (मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. भारतनगर, खासबाग) या दोघांसमवेत त्यांची चांगली मैत्री होती.

या दोघांना व्यवसायात फायदा होत नव्हता. त्यांच्यावर कर्ज वाढले होते, शिवाय चैनीसाठी रक्कमही कमी पडत होती. इबादुल मात्र कारागीरी व्यवसायातून मोठी रक्कम कमवत होता. त्यामुळे त्याला लुटायची योजना या दोघांनी आखली. यासाठी त्यांनी सादिक तोरगल याला आपली योजना सांगून त्यालाही सामील करून घेतले.

गोव्याला जातना लुटीचे नियोजन

उपरोक्त दोघा मित्रांनी इबादुलला कॅसिनो खेळण्यासाठी गोव्याला घेऊन जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार २० मेरोजी त्यांनी इबादुलला गोव्याला नेले. परंतु, आधीच ठरलेल्या नियोजनानुसार अन्य पाच ते सहा जणांनी किणये गावच्या पुढे असलेल्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला उचवडे गावच्या हद्दीतील बैलूर क्रॉसजवळ त्यांची कार अडवली. गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत सर्वांना खाली उतरवले आणि तिघांच्या खिशात असलेलली रोख रक्कम काढून घेतली. दोघा मित्रांकडे प्रत्येकी ३० हजार तर इबादुलकडील ५० हजाराची अशी १ लाख १० हजाराची रक्कम घेतली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही काढून घेऊन पोबारा केला.

मित्रच निघाले शत्रू

फिर्याद खानापूर पोलिसांत दिल्यानंतर पोलीस निरीक्षक एच. एल. गवंडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. कारण, लुटीत इबादुलचे दोघे मित्रच सामील असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी रबीयुल, अली या दोघांसह सादिक अब्दुलरेहमना तोरगल (वय ३७, शहापूर), विवेक चंद्रकांत पाटील (वय ३३, रा. कपीलेश्वर मंदिरजवळ, बेळगाव), प्रशांत महादेव चव्हाण (वय ३७, कपीलेश्वर रोड, तांगडी गल्ली, बेळगाव), नितीन राजाराम चव्हाण (वय ३६, रा. गायत्रीनगर, खासबाग), दिगंबर नागेश पाटील ( वय २६, रा. शिवशक्तीनगर अनगोळ) व मयुर राजू घाडी (वय २६, रा. बसवण गल्ली, शहापूर) यांना अटक केली.

तसेच पोलिसांनी साडेसहा लाखांच्या दोन कार, धमकीसाठी वापरलेले गावठी पिस्तूल, चाकू, आठ मोबाईल व सोन्याची दोन बनावट बिस्कीटे जप्त केली आहेत. बैलहोंगलचे उपअधीक्षक वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूरचे निरीक्षक एल. एच. गवंडी, नंदगडचे निरीक्षक रविकुमार धर्मट्टी, कित्तूरचे उपनिरीक्षक भरत, निरंजनस्वामी, प्रोबेशनरी पीएसआय बसवराज एम. एच. इरगार, यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news