बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अंड इंडस्ट्रीजची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. सोमवारी (दि. 21) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी व्यापारी आणि औद्योगिक गटातून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे जितक्या जागा तितकेच अर्ज उरल्याने निवड बिनविरोध झाली.
निवडणुकीसाठी व्यापारी आणि उद्योजक अशा दोन्ही गटातून एकूण दहा जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले होते. सोमवारी माघार घेण्याचा अंतिम दिवस होता. व्यापारी गटातून आजीव सभासदातून मंजुनाथ हेगडे, विजय दरगशेट्टी, रोहित कपाडिया, संजय हेडा, सचिन हंगिरगेकर, आप्पासाहेब गुरव तर सामान्य सभासदातून सुधीर चौगुले अशा एकूण सातजणांनी अर्ज केला होता. त्यात संजय हेडा यांनी माघार घेतल्यान उर्वरित सहाजणांची बिनविरोध निवड झाली.
औद्योगिक गटातून आजीव सभासदातून अशोक कोळी, विनित हरकुणी, सचिन सबनीस, दयानंद नेतलकर तर सामान्य सभासद म्हणून बसवराज रामपुरे अशा एकूण पाचजणांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी अशोक कोळी यांनी अखेर माघार घेतल्याने उर्वरित चौघांची बिनविरोध निवड झाली.
मागील आठवड्यात निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. 17 रोजी दोन्ही गटातून बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 18 रोजी छाननी करण्यात आली. 28 रोजी मतदान प्रक्रिया होती. तत्पूर्वी म्हणजेच आज माघारीच्या दिवशीच दोन्ही गटातील प्रत्येकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रवीण परमशेट्टी यांनी काम पाहिले.
अध्यक्ष संजय कत्तीशेट्टी, सचिव राजेंंद्र मुतगेकर यांनी निवडणूक टाळून निवड बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले. दोन्ही गटातून एकेकाने अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.