जमखंडी : राज्य परिवहनची बस व ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात बसमधील 22 प्रवासी गंभीर जखमी झाले. सदर दुर्घटना बागलकोट जिल्ह्यातील लोकापूरजवळील मल्लापूर येथे बुधवारी दुपारी घडली.
बस इलकलहून लोकापूरमार्गे बेळगावकडे निघाली होती. ट्रक बेळगावहून लोकापूरकडे येत असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. बसमध्ये 50 प्रवासी होते. त्यापैकी 22 जण जखमी झाले. हा अपघात घडताच जवळच शेतात असलेल्या नागरिकांनी मदत कार्य सुरू केले. बेळगाव रायचूर या राज्य मार्गावर अपघात झाल्याने या मार्गाची वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती. लागलीच जखमींना चार रुग्णवाहिकेतून लोकापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. अपघातात बसचा एका भागाचा चक्काचूर झाला.
घटनास्थळी बागलकोट एस.पी. सिद्धार्थ गोयल, जमखंडीचे डीवायएसपी सय्यद रोशन जमीर, मुधोळ सीपीआय महादेव शिरहट्टी, पीएसआय काडप्पा जक्कन्नवर यांनी भेट दिली. अपघाताची नोंद लोकापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.