बेळगाव : चोरट्यांनी भवानीनगर येथील उद्योजकाचे घर फोडून सोने व चांदीचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे. या चोरीच्या घटनेमुळे भवानीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उद्योजक रोहन राजेश जाधव (रा. पाटील गल्ली, मंडोळी रोड, भवानीनगर) यांच्या घरी 31 डिसेंबर 2025 रोजी सायं. 6 पासून 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 पर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आले आहे. चोरट्यांनी सुमारे 4 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय 24 डिसेंबर रोजी गोव्याला गेले होते. 29 डिसेंबर रोजी रोहन जाधव, त्यांचा भाऊ मनीष, मावशीचा मुलगा व गोव्यातील एक मित्र असे चौघे बेळगावला परतले होते. रोहन यांचे वडील राजेश जाधव व आई गोव्यातच राहिले होते. गोवा येथून आलेले चौघे 31 डिसेंबर रोजी बेळगाव येथील हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले. उशीर झाल्याने रात्री ते हॉटेलमध्येच थांबले. हीच संधी साधून चोरट्यांनी 31 डिसेंबर रोजी रात्री घरफोडी करून ऐवज लंपास केला. ही घटना 1 जानेवारी रोजी दुपारी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. शेजाऱ्यांनी घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची माहिती जाधव यांना दिली. जाधव यांनी तत्काळ घरी धाव घेतली असता बेडरूमच्या खिडकीचे ग्रील कापल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता हॉल तसेच देवघरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल होऊन तपास केला. यावेळी श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळले.
त्यामुळे चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घरात पाहणी केली असता 3 लाख 60 हजार रुपये किमतीची 2 किलो 750 ग्रॅम चांदी तसेच 1 लाख 30 हजार रुपये असा सुमारे 4 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिसांनी ठसे तसेच सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले छबी यांचे फुटेज घेतले असून तपास सुरू केला आहे.