बेळगुंदी : येथील मल्लाप्पा भरमू तळवार (वय 42) याचा आजरा येथील नाल्यात पडून मृत्यू झाला. पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात मल्लाप्पा वाहून जात असताना स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही.
ही दुर्घटना 17 जूनरोजी घडली होती. मात्र घरच्या लोकांना सोमवारी 30 जूनरोजी माहिती मिळाली.
मल्लाप्पा 17 जूनरोजी आज़र्याला गेला होता. तेथे एका नाल्याशेजारी लघुशंकेसाठी गेला असता तोल जाऊन तो नाल्यात पडला. जवळच असलेल्या लोकांनी त्याला पडताना पाहिले. मात्र पावसाचा जोर असल्याने त्याला काढणे शक्य झाले नाही. सदर घटनेची नोंद आजरा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला. मात्र अति पावसामुळे मृतदेह दोन दिवस सापडला नाही. गुरुवार 19 जूनरोजी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी चार दिवस ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख न पटल्याने 25 जूनरोजी मल्लाप्पाच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केले.
मल्लाप्पा हा गवंडी कामगार होता. कामानिमित्त तो 12 जूनरोजी आजरा येथे गेला होता. पंधरा दिवस झाले, तरी फोनही नाही आणि घरी परत आला नाही म्हणून पत्नी निर्मला आजरा पोलिस स्टेशन येथे मल्लाप्पा हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. त्यावेळी पोलिसांनी तिला बेवारस म्हणून नोंद केलेल्या मलाप्पाच्या मृतदेहाचा फोटो दाखवला. तिने तो ओळखला. त्यानंतर तो मृतदेह मल्लाप्पा तळवारचाच असल्याचे सिद्ध झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे.