बेळगाव : विसर्जनासाठी सज्ज असलेला कपिलेश्वर तलाव. Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : बाप्पा चालले गावाला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांना उत्साह देणार्‍या यंदाच्या सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळासह जिल्हा प्रशासनाने मिरवणुकीचे नेटके नियोजन केले आहे. मंगळवारी (दि. 17) सायंकाळी चार वाजता मिरवणुकीस हुतात्मा चौक येथून प्रारंभ होणार आहे.

पुणे, मुंबई, कोल्हापूरनंतरची मोठी आणि आकर्षक असणारी विसर्जन मिरवणूक बेळगावच्या मिरवणुकीकडे पाहिले जाते. याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. त्यामुळे महामंडळासह प्रशासनानेही विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. शहर परिसरातील विसर्जन तलाव सज्ज ठेवण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. पोलिसांनीही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. सर्व मंडळांनी वेळेत मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आले आहे. मुख्य मिरवणुकीत सुमार 200 हून अधिक मंडळाच्या श्रीमूर्ती सहभागी हाणार आहेत.

शहरात आठ कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच गणेशमूर्ती संकलनासाठी शहर व उपनगरात फिरती वाहने देखील दुपारपासून शहरातील प्रमुख मार्गावर फिरणार आहेत. शहर उपनगरात सुमारे 350 हून अधिक सार्वजनिक मंडळाच्या श्रीमूर्ती आहेत. यापैकी मुख्य मिरवणुकीत 200 हून अधिक मंडळाच्या श्रीमूर्ती सहभागी होणार आहेत. दरवर्षी मिरवणुकीत श्रीमूर्तीची संख्या वाढत असल्याने मिरवणूक संपायला दुसर्‍या दिवशीची सायंकाळ होत आहे. त्यामुळे प्रशासनासह मध्यवर्ती सार्वजिनक गणेश महामंडळ प्रयत्न करत आहे.

शहरातील प्रमुख तलावासह गणेशमूर्तींचे वडगाव, शहापूर, टिळकवाडी, भाग्यनगर, अनगोळ येथे निर्माण केलेल्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येणार्‍या गणेश मंडळ व गणेश भक्तांचे दरवर्षीप्रमाणे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व महापालिका वतीने स्वागत करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. 17) सायंकाळी 4 वाजता विसर्जन मिरवणूक सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

किल्ला तलाव, वडगाव, शहापूर व अनगोळ या ठिकाणी गणेश मूर्तीची विसर्जनासाठी नेटके नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता पर्यावरणाचे रक्षण करत सुरक्षित व उत्साहाच्या वातावरणात करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शहरात विविध ठिकणी 8 गणेश विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली असून ती मूर्ती संकलन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. विसर्जन तलावाजवळ निर्माल्य कुंडाची उभारणी करण्यात आली असून पाण्यामध्ये निर्माल्य टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सायंकाळी चार वाजता मिरवणुकीला प्रारंभ

हुतात्मा चौक येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह आजी माजी खासदार व आमदार तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पहिल्या श्रीमूर्तीचे पूजन होईल. यानंतर पारंपरिक मार्गावरून मिरवणूक पुढे मार्गस्थ होईल. हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, जत्ती मठ, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, शनिमंदिर मार्गे कपिलेश्वर तलाव येथे मिरवणुकीची सांगता होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT