Belgaum Annotsav
बेळगाव: येथील अंगडी मैदानावर सुरू असलेल्या रोटरी 'अन्नोत्सव' खाद्य महोत्सवाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी हजारो खाद्यप्रेमींनी मैदानावर गर्दी केली होती. बेळगाव आणि आसपासच्या भागातून आलेल्या लोकांमुळे हा महोत्सव भारताच्या 'विविधतेतून एकता' या संस्कृतीचे दर्शन घडवणारा ठरला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या 'बूगी वूगी' नृत्य स्पर्धेने प्रेक्षकांची मने जिंकली. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेक स्पर्धकांनी आपल्या नृत्य कलेचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या स्पर्धेमुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
खाद्य विभागात देशातील विविध प्रांतांमधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांनी खवय्यांचे लक्ष वेधून घेतले. कर्नाटकचा बेन्ने डोसा, केरळचे अप्पम आणि फिश करी, महाराष्ट्राचे थालीपीठ, मालवणी वडे आणि शागोती, राजस्थानची जिलेबी आणि दिल्लीच्या चाट स्टॉल्ससमोर खवय्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. गोवन पद्धतीचे माशांचे पदार्थ देखील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरले आहेत. हा खाद्य महोत्सव १८ जानेवारीपर्यंत चालणार असून, येथे विस्तीर्ण आणि विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.