बेळगाव ः रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठी पुन्हा 50 टक्के दंड भरण्याची सोय करण्यात आली आहे. तसा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून पोलिस आयुक्तालयाने तसे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. शुक्रवारपासून (दि. 21) 12 डिसेंबरपर्यंत दंड भरण्याची मुभा आहे. त्यामुळे, ज्यांच्या वाहनांचा दंड थकीत आहे त्यांनी दंड भरावा, असे आवाहन पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
दंडात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय वेळोवेळी घेतला जातो. गणेशोत्सव काळात 20 दिवस 50 टक्के दंडाची घोषणा केली होती. परंतु, गणेशोत्सव सणामुळे त्या काळात फारसा दंड वसूल झालेला नव्हता. त्यामुळे, आता पुन्हा दंड भरण्यासाठी मुभा दिली आहे. तसा आदेश बंगळूरहून 20 रोजी निघाला असून त्या आदेशाची प्रत येथील पोलिस आयुक्तालयाला मिळाली आहे. त्या आधारे पोलिस आयुक्तांनी दंड भरण्याचे आवाहन केले आहे.