Belgaon  pudhari photo
बेळगाव

Belgaon : लाडकी आजी सोडून गेली, पण तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नातीने थेट गाठलं परीक्षा केंद्र!

Belgaon : आजीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून 'तिने' दहावीचा लिहिला पेपर

पुढारी वृत्तसेवा

student reached SSC board exam after grandmother death

खानापूर : वासुदेव चौगुले

नातीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. नातीची दहावीची परीक्षा, घरी आजीला अखेरचा निरोप देण्यासाठी सुरू असलेली तयारी, तरीही मोठी हो हा आजीनेच दिलेला आशीर्वाद सार्थ ठरविण्यासाठी डबडबलेल्या डोळ्यांनी ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. पूर्ण तीन तास बसून पेपर लिहला.

त्यानंतर घरी जाऊन डोळे भरून आजीचे शेवटचे दर्शन घेऊन तीने आपल्या पहिल्या आणि सर्वात जवळच्या मैत्रिणीला अखेरचा निरोप दिला. या विद्यार्थीनीचे नाव आहे प्राची प्रल्हाद मादार. ती मणतुर्गा (ता. खानापूर) येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कूलमध्ये दहावीत शिकते.

तिची आजी रुक्मिणी दशरथ मादार (वय ७२) यांचे हृदयविकाराने सोमवारी रात्री साडेनऊ वाजता बेळगाव येथील दवाखान्यात निधन झाले. रात्रीच मृतदेह मणतुर्गा येथे आणण्यात आला. तथापि, नातेवाईक आणि पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणे आवश्यक असल्याने आज मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले. पण, रुक्मिणी यांची नात प्राची हिच्या दहावी परीक्षेचा आज इंग्रजी पेपर असल्याने कुटुंबासमोर पेच निर्माण झाला.

तथापी, आजी रुक्मिणी यांचीच 'भलेही उपाशी रहा पण पुस्तके शिका' अशी शिकवण असल्याने मादार कुटुंबाने प्राचीला धीर दिला. पेपर लिहून येईपर्यंत मणतुर्गा ग्रामस्थ व नातेवाईकांनीही वाट पाहून सहकार्य केले. आजीच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून प्राचीने मोठ्या हिमतीने पेपर लिहिला. त्यानंतर आजीच्या अंत्यविधीत सहभागी झाली. पेपर लिहून शाळेच्या गणवेशातच प्राची अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत उपस्थित होती. कोणतीही अडचण आणि संकट शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही. असा संदेश या सावित्रीच्या लेकीने दिल्याची भावना निवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब दळवी यांनी व्यक्त केली. प्राचीचा आणखी एक पेपर असून आजीला निरोप देऊन शेवटच्या पेपरची प्राचीने जोरदार तयारी सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT