Gaur herd in bekinkere: गव्यांचा कळप थेट बेकिनकेरे गावात

भरदिवसा धुमाकूळ : पिकांचे नुकसान, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Gaur herd
Gaur herdPudhari
Published on
Updated on

बेळगाव : बेकिनकेरे परिसराला गव्यांची समस्या काही नवीन नाही. त्यांच्याकडून पिकांचे नुकसान नेहमीच होत असते. मात्र, गव्यांचा कळप कधी गावात शिरला नव्हता. मात्र, सोमवारी (दि. 30) भरदिवसा गव्यांच्या एका कळपाने थेट गावात शिरुन धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. सुदैवानेच या गव्यांमुळे कुणाला धोका पोचला नाही. काही वेळानंतर ते आल्यापावली निघून गेले. मात्र, त्यांच्याकडून पिकांचे नुकसान सुरु असून वनखात्याने गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

वाढत्या उन्हाने डोंगर आणि वनक्षेत्रात चारा-पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी वन्यप्राणी चारा-पाण्याचा शोधात सैरभैर होऊन फिरु लागले आहेत. गव्यांच्या कळपाने आता भरवस्तीपर्यंत मजल मारली आहे. यातून वन्यप्राणी आणि मानव संघर्ष बळावण्याचा धोका आहे. पश्चिम भागात सीमेवर असलेल्या बेकिनकेरे डोंगर परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे, डोंगर पायथ्याशी असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या बटाटा, रताळी, भुईमूग, उस, मका, जोंधळा पिकांत गव्यांचा धुडगूस सुरु आहे. खायला काही न मिळाल्यास वन्यप्राणी थेट मानवी वस्तीत शिरु लागले आहेत. त्यामुळे, ग्रामस्थांची चिंताही वाढू लागली आहे.

तालुक्यातील कुद्रेमानी, बाची, बेकिनकेरे, वसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड यासह चंदगड तालुक्यातील देवरवाडी, सुंडी, महिपाळगड, होसूर, कौलगे आदी परिसरात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. दिवसाढवळ्याही वन्यप्राणी शिवारांत दिसू लागले आहेत. विशेषत: गवे, रानडुकर, तरस, मोर आदींचा त्यात समावेश आहे. वन्यप्राणी वस्तीत येऊ नयेत म्हणून डोंगर क्षेत्रात चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यापूर्वी केली होती. मात्र, अद्याप वनखाते याबाबत कोणतीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे, दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा त्रास वाढत चालला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news