बेळगाव : गणेशपूर परिसरातील महालक्ष्मीनगर परिसरातील घरात जबरदस्तीने घुसून ताबा घेण्याचा प्रयत्न करणार्या चौघांविरोधात कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
हे प्रकरण देखील दिवंगत माजी केंद्रीयमंत्री बी. शंकरानंद यांच्या मालमत्तेशी संबंधित आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या मालमत्तेची बोगस कागदपत्रे तयार करून त्याची विक्री करणार्या आठ जणांविरोधात खडेबाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रोहिणी अशोक आनंद (रा. लक्ष्मीटेक, महालक्ष्मीनगर, तिसरा क्रॉस) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची आई जयश्री बी. शकरानंद यांच्या मालकीचे घर आहे. सुनील तळवार (रा. कोचेरी, ता. हुक्केरी) व अन्य तिघे संशयित 23 मे रोजी येथील घरात घुसले. तसेच त्यांनी नातेवाईक व भाडेकरूंना घर रिकामे करण्याची धमकी दिली. याला विरोध करताच संशयितांनी अश्लील शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
फिर्याददार रोहिणी यांची आई जयश्री यांचा अपघात झाल्याने त्या येथे नाहीत. ही संधी साधून मालमत्ता हडपण्यासाठी जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला आहे. त्यानुसार या चौघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर तपास करीत आहेत.
फिर्यादी रोहिणी यांनी काही दिवसांपूर्वी खडेबाजार पोलिसांत आपल्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जिल्हा नोंदणी आणि उपनोंदणी अधिकार्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.