बेळगाव ः कालव्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन दहा वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 26) दुपारी रामदुर्ग तालुक्यातील पदमंडीत उघडकीस आली. हणमंत दुर्गाप्पा हगेद (वय 10) व बसवराज रमेश सोमण्णावर (10, दोघेही रा. चुंचनूर, ता. रामदुर्ग) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हणमंत व बसवराज आपल्या वडिलांसोबत मेंढ्या चारण्यासाठी पदमंडी गावच्या शिवारात गेले होते. तेथून काही अंतरावर असलेल्या कालव्यात ते आंघोळीसाठी गेले होते. मात्र, अचानक वाढलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात दोघेही पाण्यात वाहून गेले. दोन्ही मुले बराच वेळ झाला तरी न परतल्याने त्यांचे पालक कालव्याकडे गेले. यावेळी त्यांचे चप्पल व कपडे काठावर आढळून आले. त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. काही वेळाने दोघेही बुडाल्याचे आढळून आले. ही माहिती कटकोळ पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढले. मुलांचे मृतदेह पाहून पालकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला होता. या घटनेमुळे चुंचनूर गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची नोंद कटकोळ पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.